Russia-Ukraine War : रशिया-युक्रेनने केली शेकडो कैद्यांची सुटका

Russia-Ukraine War – रशिया आणि युक्रेनने सोमवारी प्रतिस्पर्धी बाजूच्या आपापल्या ताब्यात असलेल्या शेकडो कैद्यांची आदलाबदल केली. युद्धकाळात पकडलेल्या आणि ताब्यात घेण्यात आलेल्या शेकडो युद्धकैद्यांना यानिमित्ताने मुक्त करण्यात आले. युद्धबंद्यांच्या आदला-बदलीसाठी संयुक्त अरबअमिरातीने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केली होती, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.
रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनच्या १८९ कैद्यांना मुक्त करण्यात आले. यामध्ये लष्करी सैनिक, बॉर्डर गार्ड आणि नॅशनल गार्डसह दोन सामान्य नागरिकांनाही मुक्त करण्यात आले असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांनी सांगितले. युद्धकैद्यांच्या सुटकेसाठी वाटाघाटींमध्ये पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे आभार देखील मानले आहेत.
युक्रेनच्या १८९ युद्धकैद्यांच्या बदल्यात युक्रेनच्या ताब्यात असलेल्या रशियाच्या १५० सैनिकांची सुटका करण्यात आली, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. दोन्ही बाजूंकडून सटका करण्यात आलेल्या कैद्यांच्या संख्येत तफावत असण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. रशियाच्या तावडीत सापडलेल्या सर्वांची सुटका करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही कोणालाही विसरलेलो नाही, असे झेलेन्स्की यांनी एका निवेदनामध्ये म्हटले आहे. त्यांनी मुक्त्तता झालेल्या युक्रेनच्या सैनिकांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत.
सुटका करण्यात आलेले युक्रेनचे सैनिक काळ्या समुद्रातील ओडेसा बंदराजवळच्या स्नेक आयलंडवरून रशियाने ताब्यात घेतले होते. हे बेट रशियाने युद्धाच्या सुरुवातीच्या काळातच ताब्यात घेतले होते. तसेच काही सैनिक मारिओपूलच्या लढाईच्यावेळी रशियाच्या ताब्यात सापडले होते. तेंव्हापासून हे सर्व सैनिक रशियाच्या ताब्यात होते. दुसरीकडे रशियाच्या सैनिकांना शेजारील बेलारुसमधून रशियाला आणले जात आहे. युक्रेनच्या ताब्यातून या सैनिकांना उपचारासाठी बेलारुसला नेण्यात आले होते.





