रशियाच्या अण्वस्त्रांचा साठा आणखी वर्षभर मर्यादित; अमेरिकेबरोबरचा करार फेब्रुवारीमध्ये होणार समाप्त

मॉस्को – रशिया आपल्या अण्वस्त्रांचा साठा आणखी एक वर्षभर मर्यादित ठेवणार आहे, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी म्हटले आहे. अण्वस्त्रांच्या साठ्याबाबत रशिया आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या कराराची मुदतच पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये समाप्त होणार आहे.
अमेरिकेनेही या कराराचे पालन करावे, असे आवाहन पुतीन यांनी केले आहे. रशिया आणि अमेरिकेमध्ये २०१० साली न्यू स्टार्ट नावाचा करार झाला होता. हा करार संपुष्टात येण्याचा जागतिक स्थैर्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
तसेच अण्वस्त्र स्पर्धेला प्रोत्साहन देखील दिले जाऊ शकते. धोकादायक शस्त्रास्त्र स्पर्धेला चिथावणी दिली जाणे टाळण्यासाठी आणि अंदाज करता येण्याजोगे आणि संयमाची पातळी कायम राखण्यासाठी न्यू स्टार्ट कराराची स्थिती कायम ठेवणे आवश्यक आहे.
विशेषतः सध्याच्या संवेदनशील आणि दोलायमान परिस्थितीमध्ये हे आवश्यक आहे. त्यासाठी न्यू स्टार्ट कराराची स्थिती ५ फेब्रुवारी २०२६ नंतरही आणखी एक वर्ष कायम ठेवण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे, असे पुतीन टिव्हीवरील संबोधनामध्ये म्हणाले.
परिस्थितीचा अंदाज घेऊन आम्ही अण्वस्त्रांच्या प्रमाणाबाबतचा निर्णय आत्मसंयमाच्या आधारे आणि स्वेच्छेने घेणार आहोत, असेही पुतीन म्हणाले. रशियाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून अमेरिकेने देखील आपली अण्वस्त्रे मर्यादित ठेवावीत असे आवाहनही पुतीन यांनी केले. अमेरिकेने एकतर्फीपणे काही पावले उचलल्यास तसे करणे सध्याच्या परिस्थितीतील संरक्षण समतोल बिघडू शकतो, असेही पुतीन म्हणाले.
अमेरिकेच्या अण्वस्त्रविषयक हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश पुतीन यांनी रशियाच्या एजन्सींना दिले आहेत. जरी करारातून रशिया बाहेर पडला असला, तरी कराराचे पालन केल्याचा दावा रशियाने केला आहे. पण युक्रेन युद्धादरम्यान पुतीन यांनी वारंवार आपल्या विरोधकांवर अण्वस्त्रांच्या वापराची धमकी दिली आहे.
काय आहे न्यू स्टार्ट करार
अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे तत्कालिन अध्यक्ष दिमित्री मेडवेदेव यांनी न्यू स्टार्ट करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या करारानुसार दोन्ही देश अण्वस्त्रांचे प्रमाण तैनात केलेल्या १,५५० अण्वस्त्रे आणि ७०० क्षेपणास्त्रे आणि बॉम्बरपेक्षा वाढू देणार नाहीत, हे मान्य केले गेले होते.
दोन्ही देशांनी या कराराचे पालन केले का नाही, हे त्रयस्थ निरीक्षकांकडून तपासून बघण्याची तरतूदही मान्य केली गेली होती. मात्र २०२० पासून या अण्वस्त्रांची तपासणी झालेली नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये पुतीन यांनी हा करारातील रशियाचा सहभाग काढून घेतला.
युक्रेन युद्धामध्ये रशियाचा पराभव हेच आपले उद्दिष्ट असल्याचे अमेरिका आणि नाटोने उघड म्हटले होते. त्यानंतर जोपर्यंत अमेरिकेच्या अण्वस्त्रांच्या तपासणीची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत अमेरिकेच्या निरीक्षकांना रशिया तपासणी करण्याची परवानगी देणार नाही, असे ते म्हणाले होते.





