Russia-Ukraine War : युक्रेनमधील मदत केंद्रावर रशियाचा मारा, ३१ ठार
रशियाने रात्रभरात युक्रेनची ८५६ ड्रोन पाडल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. तर रशियाच्या राजधानीच्या दिशेने ४९३ ड्रोन डागण्यात आले होते, असे मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले.

Russia-Ukraine War – युक्रेनमधील मदत केंद्रावर रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये किमान ३१ जण ठार झाले असून डझनभर लोक अजूनही बेपत्ता आहेत. रशियाने रात्रीभरात वीज प्रकल्प आणि रुग्णालयांवर हल्ले केले. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत.
युक्रेनच्या दक्षिणेकडील झापोरिझ्झिया भागात रशियाने केलेल्या माऱ्यात कोम्युशुवाखा या गावातील मदत सुविधा आणि निवारा केंद्र उद्ध्वस्त झाले.
या केंद्राच्या ढिगाऱ्याखाली ४५ पेक्षा जास्त लोक गाडले गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत ३१ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रशियाने नऊ प्रदेशांमधून २८९ लढाऊ ड्रोन, १७ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ५९ क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्याने आणीबाणीच्या परिस्थितीत वीज पुरवठा खंडीत करण्यात आला, असे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले.
या हल्ल्यातील जीवितहानीमुळे झापोरिझियामध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे, तिथे सोमवारच्या हल्ल्यात सुमारे दीड टन स्फोटकांनी भरलेले रशियाचे बंकर-भेदक बॉम्ब वापरण्यात आले होते. तर खार्किवच्या ईशान्य भागात झालेल्या रशियाच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या संयुक्त हल्ल्यात किमान ६२ जण जखमी झाले.
रशियाने रात्रभरात युक्रेनची ८५६ ड्रोन पाडल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. तर रशियाच्या राजधानीच्या दिशेने ४९३ ड्रोन डागण्यात आले होते, असे मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले.





