Russian general Vladimir Alekseyev : रशियाच्या लष्करी गुप्तचांच्या उपप्रमुखावर गोळीबार; युक्रेनचा हात असल्याचा केला आरोप
Russian general Vladimir Alekseyev - रशियाच्या लष्करी गुप्तचरांच्या उपप्रमुखावर आज राजधानी मॉस्कोमध्ये गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये अधिकारी गंभीर जखमी झाला आहे.

Russian general Vladimir Alekseyev – रशियाच्या लष्करी गुप्तचरांच्या उपप्रमुखावर आज राजधानी मॉस्कोमध्ये गोळीबार करण्यात आला.
या हल्ल्यामध्ये अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. रशियाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या हत्यांचे सत्र अलिकडच्या काळात घडले आहे. या हत्यांमागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप रशियाकडून केला जातो आहे.
ले. जन. व्लादिमीर अलेक्सेयेव (Vladimir Alekseyev ) असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या लष्करी गुप्तचरांच्या अधिकाऱ्याचे नाव आहे. मॉस्कोच्या वायव्येकडील एका अपार्टमेंटच्या बाहेर काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या.
जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे तपास कमिटीच्या प्रवक्त्या स्वेतलाना पेट्रेन्को यांनी निवेदनात म्हटले आहे. मात्र अलेक्सेयेव यांच्यावरच्या हल्ल्यामागे कोण असावे, याबाबत मात्र या प्रवक्त्या महिलेने कोणाचेही नाव घेतले नाही.
ले. जन. अलेक्सेयेव हे २०११ पासून लष्करी गुप्तचरांचे प्रथम उपप्रमुख आहेत. सीरियामधील रशियाच्या कारवाईबद्दल त्यांना हिरो ऑफ रशिया मेडलने गौरवण्यात आले आहे.
२०२३ मध्ये रशियाचे (Russian ) भाडोत्री सैन्य असलेल्या वॅग्नर ग्रुपने रशियाच्या दक्षिणेकडील रोस्तोव-ऑन -डॉन या मुख्यालयाचा ताबा घेतला होता, तेंव्हा या गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझीन यांच्याशी बोलत असतानाचा अलेक्सेयेव यांचा व्हिडीओ पुढे आला होता.
अमेरिकेच्या मध्यस्थीने रशिया-युक्रेनमधील दोन दिवसांची चर्चा ओमानमध्ये पार पडल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा गोळीबार झाला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना या हल्ल्याबाबत कळवण्यात आले असून वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असे पुतीन यांनी म्हटले आहे.






