रहिवासी इमारतीवर कोसळले रशियाचे लढाऊ विमान; दोन पायलट ठार

मॉस्को – रशियाचे एक लढाऊ विमान सैबेरियामध्ये रहिवासी इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये दोन्ही वैमानिक ठार झाले. सैबेरियाच्या इरकुत्सक शहरामध्ये ही दुर्घटना घडली. रशियाच्या लढाऊ विमानाला एका आठवड्याच्या आत झालेला हा दुसरा अपघात आहे. आठवड्याभरापूर्वीच रशियाचे आणखीन एक लढाऊ विमान अशाच प्रकारे रहिवासी भागामध्ये कोसळले होते. त्या विमान अपघातात 15 जण ठार आणि 19 जण जखमी झाले होते.
ज्या रहिवासी इमारतीवर हे विमान कोसळले ती एक खासगी इमारत होती आणि या इमारतीत दोन कुटुंबे रहात असल्याचे इरकुत्सकचे गव्हर्नर इगोर कोबजेव्ह यांनी सांगितले. विमान जरी इमारतीवर कोसळले असले, तरी इमारतीतील कोणीही या अपघातात ठार झाले नाही.
सुखोई- 30 हे लढाऊ विमान प्रशिक्षणाच्या उड्डाणादरम्यान कोसळले. त्यानंतर विमानाला आग लागली, असे रशियाच्या आपत्कालिन मंत्रालयाच्या शाखेने म्हटले आहे. हे विमान अगदी सरळ उभ्या कोनामध्ये इमारतीवर येऊन पडले असल्याचे सीसीटिव्हीमध्ये दिसते आहे. अन्य सीसीटिव्हीमध्ये इमारतीला लागलेली आग आणि अग्निशामक दलाकडून ही आग विझवण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न दिसत आहेत.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून रशियाच्या 11 लढाऊ विमानांचा अपघात झाला आहे. लढाईच्यावेळी पाडल्या गेलेल्या विमानांपेक्षा अपघातामध्ये पडलेल्या विमानांची संख्या जास्त आहे, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे.




