HAL Tejas fighter crash: तेजस अपघातात ‘या’ राज्याचा सुपुत्र शहीद; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

दुबई: भारतीय हवाई दलाचे (IAF) लढाऊ विमान ‘तेजस’चा (HAL Tejas) दुबई एअर शो २०२५ मध्ये (Dubai Air Show 2025) प्रदर्शन करताना भीषण अपघात झाला. यात वैमानिक विंग कमांडर नमांश स्याल यांना वीरमरण आले. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी आज, २१ नोव्हेंबर रोजी या दुःखद घटनेची माहिती देत शहीद वैमानिकाची ओळख पटवली.
मुख्यमंत्री सुखूंनी व्यक्त केले दुःख –
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी ‘तेजस’ अपघातात शहीद झालेल्या वैमानिकाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत त्यांनी विंग कमांडर नमांश स्याल हे हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्याचे रहिवासी असल्याचे नमूद केले.
“दुबई एअर शोमधील तेजस विमान अपघातात हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्याचा शूर सुपुत्र नमांश स्यालजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. देशाने एक शूर, समर्पित आणि धाडसी वैमानिक गमावला आहे,” असे त्यांनी हिंदीतून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्यांनी पुढे शोकसंवेदना व्यक्त करत, “मी शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. शूर सुपुत्राला सलाम. स्यालजी यांच्या अदम्य शौर्याला, समर्पणाला आणि राष्ट्रसेवेच्या भक्तीला मनापासून नमन,” असे म्हटले.
दुबई एयर शो में हुए तेजस विमान हादसे में हिमाचल प्रदेश के कांगड़ा ज़िला के वीर सपूत नमन स्याल जी के निधन का समाचार अत्यंत दुःखद और हृदयविदारक है।
देश ने एक बहादुर, कर्तव्यनिष्ठ और साहसी पायलट खो दिया है।
शोकाकुल परिवारजनों के प्रति अपनी गहरी संवेदनाएँ प्रकट करता हूँ।
वीर सपूत… pic.twitter.com/lfX1yinf4Q
— Sukhvinder Singh Sukhu (@SukhuSukhvinder) November 21, 2025
अपघात आणि हवाई दलाचे स्पष्टीकरण –
दुबईतील अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Al Maktoum International Airport) दुबई एअर शो २०२५ च्या शेवटच्या दिवशी हवाई प्रात्यक्षिक (flight demonstration) करत असताना तेजस विमानाला अपघात झाला आणि त्याने पेट घेतला.
भारतीय हवाई दलाने (IAF) २१ नोव्हेंबर रोजी दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “आज दुबई एअर शोमध्ये हवाई प्रदर्शनादरम्यान एका आयएएफच्या तेजस विमानाचा अपघात झाला. या अपघातात वैमानिकाला गंभीर दुखापत झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. हवाई दल या प्राणहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त करते आणि दुःखाच्या या कठीण काळात आम्ही शोकाकुल कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत.”
अपघागाचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी न्यायालय (Court of Inquiry) स्थापन करण्यात येत असल्याचेही हवाई दलाने स्पष्ट केले आहे. अपघातात हुतात्मा झालेले विंग कमांडर नमांश स्याल यांच्याबद्दल हवाई दलाने अधिक माहिती अद्याप दिलेली नाही.




