Air India plane crash: ‘पायलट जबाबदार’ असल्याचा इटालियन मीडियाचा दावा भारताने फेटाळला; तपास अद्याप सुरूच
Air India plane crash:

Air India plane crash: गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या ‘एआय-१७१’ (AI-171) विमान अपघाताबाबत इटालियन वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेला खळबळजनक अहवाल भारताच्या ‘विमान अपघात तपास ब्युरो’ने (AAIB) पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
हा अपघात वैमानिकाच्या जाणीवपूर्वक केलेल्या कृतीमुळे झाल्याचा दावा इटालियन मीडियाने केला होता, मात्र भारताने हा दावा चुकीचा आणि केवळ तर्कवितर्कांवर आधारित असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण भारतीय तपास यंत्रणेने दिले आहे.
काय केला दावा ?
इटलीतील प्रसिद्ध दैनिक ‘कॉरिअरे डेला सेरा’ने आपल्या वृत्तात असा दावा केला होता की, नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन दरम्यान झालेल्या चर्चेनुसार तपासकर्त्यांनी तांत्रिक बिघाडाची शक्यता फेटाळून लावली आहे. विमानाचा इंधन पुरवठा जाणीवपूर्वक बंद केल्यामुळे हा अपघात झाला असून, तपास अधिकारी आता अंतिम अहवाल तयार करत असल्याचे या वृत्तात म्हटले होते. या अहवालात विमानाचे कमांडर कॅप्टन सुमीत सभरवाल यांना मुख्य संशयित ठरवण्यात आले असून, ते नैराश्यात होते असा दावा निनावी सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला होता.
प्रसारमाध्यमांना संयम पाळण्याचे आवाहन –
या प्रकरणावर कडक भाष्य करताना AAIB ने म्हटले आहे की, हा तपास ‘विमान नियम २०२५’ आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या मानकांनुसार अत्यंत तांत्रिक आणि पुराव्यांवर आधारित पद्धतीने केला जात आहे. तपासाचा मुख्य उद्देश अपघाताचे मूळ कारण शोधून भविष्यातील सुरक्षा सुनिश्चित करणे हा असतो, कोणावरही अकाली दोषारोप करणे हा नाही.
अशा प्रकारच्या असत्य बातम्यांमुळे जनतेमध्ये विनाकारण चिंतेचे वातावरण निर्माण होते आणि सुरू असलेल्या व्यावसायिक तपासाच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो, असे सांगत ब्युरोने प्रसारमाध्यमांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे.
२६० जणांचा झाला होता मृत्यू –
जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्राथमिक अहवालाचा संदर्भ देताना यंत्रणेने स्पष्ट केले की, उड्डाणानंतर काही क्षणातच विमानाचे ‘फ्यूल कंट्रोल स्विच’ बंद झाले होते, ज्यामुळे इंजिनची शक्ती कमी झाली. कॉकपिटमधील संभाषणात एका वैमानिकाने दुसऱ्याला इंधन पुरवठा बंद करण्याबाबत विचारले असता, दुसऱ्याने तो नकार दिला होता. मात्र, ही परिस्थिती नेमकी कशामुळे ओढवली याचा शोध अद्याप घेतला जात आहे.
जून २०२५ मध्ये अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच हे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान एका वैद्यकीय हॉस्टेलवर कोसळले होते. या भीषण दुर्घटनेत २६० जणांचा मृत्यू झाला असून केवळ एक प्रवासी सुदैवाने वाचला होता. तपास पूर्ण झाल्यावरच अंतिम अहवाल प्रसिद्ध केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




