russia-ukrainian war : युक्रेनचे आणखी एक गाव जिंकल्याचा रशियाचा दावा

किव्ह, (युक्रेन) – पूर्व युक्रेनच्या डोनेत्स्क प्रदेशातील त्यांच्या अथक हल्ल्यात आणखी एक गाव ताब्यात घेतले असल्याचा दावा रशियाने शुक्रवारी केला. जवळजवळ तीन वर्षांच्या युद्धानंतर ते पोकरोव्स्क या महत्त्वाच्या युक्रेनियन लॉजिस्टिक्स हबवर पोहोचले आहे, असे रशियाच्या सैन्यदलाने म्हटले आहे.
रशियाच्या सैन्याने नोव्होवासिलिव्हका ताब्यात घेतल्याच्या वृत्ताचे त्रयस्थांमार्फत समर्थन केले जाऊ शकलेले नाही आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात त्वरित कोणतीही टिप्पणी केली नाही.
तथापि, हे गाव किमान अंशतः रशियाच्या नियंत्रणाखाली होते, असे शुक्रवारी पहाटे युक्रेनच्या जनरल स्टाफने प्रकाशित केलेल्या युद्धभूमीच्या नकाशांवरून दिसून आले. वृत्तसंस्थेकडील एका अन्य नकाशाशी तुलना केल्यावर नोव्होवासिलिव्हकाच्या बहुतांश भागावर रशियाचे नियंत्रण असल्याचे आढळून आले आहे.
रशियाच्या सैन्याने अनेक महिन्यांपासून डोनेत्सकमधील पोकरोव्स्क आणि जवळील चासिव्ह यार या प्रमुख ठिकाणांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे, रशियाचे सैन्य शेतात आणि जंगलातून लढत आहेत आणि सैन्याने लहान ग्रामीण वस्त्यांना वेढले आहे. पोकरोव्स्क आणि चासिव्ह यारच्या पतनामुळे रशियाच्या सैन्याला डोनेत्सकवरील आपला ताबा पूर्ण करता आला आणि शेजारच्या डनिप्रो प्रदेशात प्रवेश करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
नोव्होवासिलिव्हका हे गाव पोकरोव्स्कच्या नैऋत्येस सुमारे ११ किलोमीटर अंतरावर आहे. रशिया पोकरोव्स्कला वेढण्यासाठी वेगाने हालचाली करण्याचा प्रयत्न करत आहे, असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतली असतानाच रशियाला युक्रेनच्या पूर्वेकडील भागात ही आघाडी मिळाली आहे. ट्रम्प यांनी युद्ध समाप्त करण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा वारंवार पुनरुच्चार केला आहे. ट्रम्प यांच्या या पुढाकारामुळेच जास्तीत जास्त भूमीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न रशिया आणि युक्रेनकडून केला जाऊ लागला आहे.





