russia ukraine war : रशियाकडून युक्रेनवर १५० ड्रोनचा मारा; एक जण ठार !

russia ukraine war – रशियाकडून काल रात्रभरामध्ये युक्रेनच्या बहुतेक भूभागात मोठ्. प्रमाणात ड्रोनचा मारा केला. रशियाकडून युक्रेनवर सतत केल्या जात असलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या युद्धबंदीच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित केली होती. त्यानंतरही रशियाने आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत.
रशियाने एकूण १४९ ड्रोन डागली. त्यापैकी ५७ ड्रोन हवेतच पाडली गेली आणि इतर ६७ इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी जॅम केली गेली, असे युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे.
शनिवारी रात्रीपासून रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये युक्रेनमधील निप्रोपेट्रोवस्क प्रांतातील पावलोकार्ड शहरात एक जण ठार झाला आणि १४ वर्षांची मुलगी जखमी झाली.
या शहरावर रशियाने सलग तिसऱ्या दिवशी ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्याच्या एक दिवस आगोदरच रशियाने कुर्स्कचा काही भाग युक्रेनच्या सैन्याच्या तावडीतून पुन्हा मिळवल्याचा दावा केला होता.
गेल्या ३ वर्षांपासून सुरू असलेले युद्ध समाप्त करण्याची पुतीन यांची ईच्छा आहे का नाही, याबद्दल ट्रम्प यांनी शनिवारी शंका उपस्थित केली होती. युक्रेनमधील रहिवासी भाग, शहरे आणि गावांमध्ये क्षेपणास्त्रांचा मारा करण्याचे कोणतेही कारण नाही.
तरी हे हल्ले का केले जात आहेत, असा प्रश्न ट्रम्प यांनी उपस्थित केला होता. शांतता चर्चेतून काही ठोस तोडगा निघू शकेल, याबद्दलच त्यांना आता साशंकता वाटत असल्याचे या वक्तव्यातून दिसून आले. रशियावर अतिरिक्त निर्बंध घालण्याचे सूतोवाच देखील ट्रम्प यांच्या टिप्पणीतून दिसून आले.





