Russia-Ukraine War : युक्रेनबरोबरची थेट चर्चा करण्यासाठी रशिया तयार; ट्रम्प आणि पुतीन यांच्यात तब्बल २ तास चर्चा

वॉशिंग्टन – युक्रेनविरोधात गेल्या ३ वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठीच्या चर्चेची तयारी रशियाने दाखवली आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी सोमवारी रात्री उशीरा ही तयारी दाखवली.
पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काल तब्बल २ तास फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर रशिया आणि युक्रेनदरम्यानच्या युद्धावर एक तोडगा निघण्याची शक्यता दिसायला लागली.
शांतता करारासाठी युक्रेनबरोबर मिळून काम करायची तयारी पुतीन यांनी दाखवली आहे. सर्व संबंधितांना मान्य होईल अशा स्थितीसाठी रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांना काही तडजोडी कराव्या लागतील, असे स्वतः पुतीन यांनीच म्हटले आहे.
युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांच्या प्रयत्नातून करण्यात येणाऱ्या वाटाघाटी योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगून याबद्दल पुतीन यांनी अमेरिकेचे आभारही मानले आहेत.
विशेषतः ट्रम्प यांच्याच पुढाकारामुळे गेल्या आठवड्यात तुर्कीयेमध्ये रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये प्रथमच थेट चर्चा शक्य झाल्याचे पुतीन म्हणाले. काळ्या समुद्राजवळच्या सोची बंदरातून पुतीन यांनी एक निवेदन प्रसिद्धीस देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
युक्रेनबरोबरच्या शांततेसाठी रशियाने प्रस्ताव सादर करावा, हे डोनाल्ड ट्रम्प यांचे मत आपल्याला पटले आहे. भविष्यातल्या शांततेसाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. शांततेसाठी दोन्ही देशांना संभाव्य युद्धबंदीची व्याख्या आणि त्याची कालमर्यादाही निश्चित करावी लागेल, असे पुतीन यांनी म्हटले आहे.
युक्रेन, पाश्चात्य देश आणि अमेरिकेनेही पुतीन यांच्यावर ३० दिवसांची युद्धबंदी मान्य करण्यासाठी मोठा दबाव आणला आहे. या युद्धबंदीच्या कालावधीमध्ये स्थायी युद्धबंदीच्या वाटाघाटी पुर्ण करता येतील, असे या सर्वांचे म्हणणे आहे.
मात्र युद्धाचे मूळ कारण वेगळेच आहे. ते दूर व्हायला हवे आहे. आम्हाला शांततेसाठी सर्वात परिणामकारक प्रयत्न केले जायला हवे आहेत. रशियाची ही भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे, असे पुतीन म्हणाले.
रशिया आणि युक्रेन दोन्ही देश मिळून शांततेसाठी आणि तात्काळ लागू होणाऱ्या युद्धबंदीसाठी वाटाघाटी करायला तयार आहेत, असे ट्रम्प यांनी देखील सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पुतीन यांच्याबरोबरची फोनवरची चर्चा चांगली झाली, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
या चर्चेमुळे युद्धबंदी तात्काळ लागू होणे आणि गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्याचे प्रयत्न सुरू होऊ शकतील, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी पुतीन यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही फोनवरून चर्चा केल्याचे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.





