russia ukraine war – रशियाने काल रात्रभरात युक्रेनवर ५०० ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला. क्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि युरोपातल्या नेत्यांच्या चर्चेत युक्रेनची सुरक्षा अधिक मजबूत करणे आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील शांतता चर्चा यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असतानाच रशियाने हा हल्ला केला आहे. रशियाने प्रामुख्याने नागरी वहाहतींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. आता काही दिवसातच हिवाळ्याची सुरुवात होणार असताना जाणीवपूर्वक उर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले गेले आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. युक्रेनच्या मध्य भागातील आणि पश्चिमेकडील भागांवर हे हल्ले केले गेले असून या हल्ल्यात किमान ५ जण जखमी झाले असल्याचे युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे. युद्धबंदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी समोरासमोर चर्चा करण्याविषयी ट्रम्प यांनी मांडलेला प्रस्ताव झेलेन्स्की यांनी स्वीकारला आहे. मात्र या छर्चेबाबत रशियाने आपले आक्षेप नोंदवले आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेच्या निमित्ताने पुतीन चीनमध्ये गेले होते. तेथे त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन या मित्र देशांच्या नेत्यांची भेट घेतली. तसेच भारताचे पंतप्रधान नेंद्र मोदी यांचीही भेट घेऊन चर्चा केली होती. रशियाकडून रात्रभर करण्यात आलेले हल्ले हे प्रात्यक्षिक आहे. पुतीन हे आपला निगरगट्टपणा दर्शवत असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. रशियावर युद्धासाठीच्या अर्थकारणावर पुरेसा दबाव आणला जात नसल्यामुळे रशियाकडून आक्रमण सुरू ठेवले गेले आहे. असे सांगून झेलेन्स्की यांनी रशियावर अधिक कठोर निर्बंध घालण्याचे आवाहन केले आहे. अधिक मदत आणि पाठिंबा मिळवण्याच्या हेतूने उत्तर युरोपीय आणि बाल्टिक देशांशी चर्चा करण्यासाठी झेलेन्स्की मंगळवारी डेन्मार्कमध्ये गेले आहेत.