Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनवर ड्रोन, क्षेपणास्त्रांचा भडिमार !

किव्ह – रशियाने आज युक्रेनच्या ६ प्रांतांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा भडिमार केला. सुमारे तासभर चाललेल्या या माऱ्यामध्ये युक्रेनची राजधानी किव्हमध्ये ३ जण ठार झाले. या हल्ल्यात ४०७ ड्रोन आणि ४४ बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. युक्रेन सैन्याने सुमारे ३० क्रूझ क्षेपणास्त्रे आणि २०० पर्यंत ड्रोन पाडली असल्याचे युक्रेनच्या हवाई दलाचे प्रवक्ते युरी इहनाट म्हणाले.
युद्धाला सुरुवात झाल्यापासून युक्रेनच्या बहुतेक शहरांवर रशियाकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा होत असतो. रशियाच्या अशा हल्ल्यांमध्ये आतापर्यंत १२ हजार पेक्षा अधिक सामान्य नागरिक मारले गेले आहेत. रशियन हल्ल्यांना प्रतिसाद देताना किव्हमध्ये तीन आपत्कालीन कर्मचारी ठार झाले, असे गृह मंत्रालयाने सांगितले.
रशिया आणि युक्रेनमध्ये वाटाघाटीचे प्रयत्न सुरू असतानाच हा हल्ला झाला आहे. इस्तंबुलमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या थेट चर्चेच्या दुसऱ्या फेरीमधून काहीही निष्पन्न झालेले नाही. युक्रेनने ३० दिवसांची युद्धबंदी आणि झेलेन्स्की यांची पुतीन यांच्याशी थेट चर्चेची मागणी केली आहे. तर युक्रेनला कोणतीही सवलत देण्यास रशियाने नकार दिला आहे. तर रशियाच्या आक्रमणाला आपण प्रत्युत्तर देऊ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.





