Rural Road Issue : विकासाच्या गप्पा फक्त कागदावरच! निमगाव केतकी ते महादेव शिव रस्त्याची दुरवस्था ; नागरिकांनी केली बॅनरबाजी

प्रभात वृत्तसेवा
निमगाव केतकी – इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरातील महादेव शिव रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. गेली कित्येक वर्षे पाठपुरावा करूनही या रस्त्याचे काम होत नसल्याने अखेर नागरिकांनी चक्क गावात बॅनरबाजी करून ग्रामपंचायतीसह प्रशासनाचे लक्ष वेधले.या रस्त्याच्या लगत असलेल्या श्रीपती जाधव वस्ती, भोंगवस्ती, नवामळा, पाटीलवस्ती या वस्त्यांतील 400 ते 500 लोकांना दररोज कामानिमित्त प्रवास करावा लागतो.
तसेच शाळेत जाणारे 40 ते 50 विद्यार्थी दररोज या चिखलमय रस्त्यामुळे त्रस्त होत आहेत. थोडा जरी पाऊस झाला तरी रस्त्यावर प्रचंड चिखल साचतो, त्यामुळे मोटरसायकलसुद्धा या मार्गाने जाऊ शकत नाही. काही वेळा विद्यार्थ्यांना चिखलात पडून शाळा बुडवावी लागल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.वारंवार ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करून मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.
शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, विकासाच्या गप्पा कागदावरच, प्रत्यक्षात मात्र नागरिकांना त्रास असा रोष व्यक्त होत आहे. सध्या या बॅनरबाजीची चर्चा निमगाव केतकी परिसरात जोरदार रंगली असून, नागरिकांच्या या तीव्र भूमिकेमुळे प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“जर रस्त्याचे काम तातडीने सुरू झाले नाही तर मंगळवारी ग्रामपंचायतीवर चिखलफेक करून आमचा रस्ता सुटेपर्यंत आम्ही धरणे आंदोलन करू.”
-बाळू जाधव, ग्रामस्थ





