Rural Education : विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! भोईरवाडीत ११ वी तर कासारसाईत ८ वीच्या वर्गाला मंजुरी
Rural Education : मुळशी तालुक्यातील माण-भोईरवाडी शाळेत अकरावी (वाणिज्य) तर कासारसाई प्राथमिक शाळेत आठवीच्या वर्गाला शिक्षण समितीची मान्यता.

Rural Education – पुणे जिल्हा परिषदेच्या काही प्राथमिक शाळांमध्ये माध्यमिकला तर मोठ्या शाळांत इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यास उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे-पाटील यांनी सहमती दर्शवली असून याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे कासारसाई आणि भोईरवाडी येथून शिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार आहे.
मुळशी तालुक्यातील आयटीनगरी असलेल्या माण मधील भोईरवाडी शाळेत अकरावी ( वाणिज्य) च्या वर्गाला मान्यता देण्यात आली आहे. कासारसाई प्राथमिक शाळेत आठवीच्या वर्गालाही मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कासारसाईतून चांदखेड किंवा नेरे मारुंजीला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची पायपीठ थांबणार आहे. तर भोईरवाडीमध्ये अकरावीचे वर्ग सुरू होणार असल्याने विशेषतः मुलींच्या महाविद्यालयीन शिक्षणाचे अडथळे दूर झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील बहुतांश मोठ्या शाळांमध्ये इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत. याच धर्तीवर जिल्ह्यातील दुर्गम भागातील मोठ्या शाळांमध्ये इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करावेत, अशी मागणी शिवाजी बुचडे यांनी जिल्हा परिषदेवर निवडून आल्यापासून सुरू केली होती. मुळशी तालुक्यातील हिंजवडी- माण जिल्हा परिषद गटातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत.
“कासारसाई आणि भोरवाडी येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत होते. या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातच शिक्षण मिळावे यासाठी कासारसाई येथे माध्यमिकच्या वर्गाला तर भोईरवाडी येथे ज्युनिअर कॉलेजला मान्यता मिळावी यासाठी पाठपुरावा करत होतो. त्याला यश आले असून आता विद्यार्थ्यांची शिक्षणासाठीची पायपीट थांबणार आहे.”
– शिवाजी बुचडे, सदस्य, जिल्हा परिषद





