Katewadi Gram Panchayat : काटेवाडीची मोठी झेप! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात मिळवला ‘हा’ बहुमान; गावात जोरदार जल्लोष
Katewadi Gram Panchayat : आरोग्य, शिक्षण ते वनविभागापर्यंतच्या सर्व शासकीय यंत्रणांचे सामूहिक योगदान; बारामती तालुक्यात काटेवाडी ग्रामपंचायत अव्वल.

Katewadi Gram Panchayat -‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’मध्ये तालुकास्तरावर काटेवाडी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गावकऱ्यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा बहुमान मिळाला असून, या यशानंतर काटेवाडीमध्ये ग्रामस्थांच्या वतीने जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. १७ सप्टेंबर २०२५ पासून काटेवाडीमध्ये हे अभियान राबवण्यास सुरुवात झाली.
स्वच्छतेच्या प्रणेत्या सुनेत्रा पवार यांनी प्रत्यक्ष व समाजमाध्यमांद्वारे सातत्याने सूचना करत ग्रामस्थांचा उत्साह वाढवला. त्यांच्या प्रेरणेमुळेच या अभियानाला मोठी गती मिळाली. या मोहिमेत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने आणि संपर्क अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. काटेवाडीचा हा गौरव करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यकारिणी, आजी-माजी संस्थांचे पदाधिकारी, तरुण, ज्येष्ठ आणि महिला वर्गाने मोठे श्रमदान केले.
यासोबतच ग्रामस्तरावर कार्यरत असणारे ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी, पशुवैद्यकीय, बचत गट, महसूल, कृषी आणि वनविभाग या सर्वच यंत्रणांनी आपापल्या विभागात उत्कृष्ट काम करत सर्वोत्तम सहकार्य केले. या सर्वांच्या सामूहिक योगदानामुळेच काटेवाडीने तालुक्यात अव्वल स्थान मिळवले.
जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी सज्ज होण्याचे आवाहन
तालुकास्तरावरील यशानंतर आता काटेवाडी गाव जिल्हा कमिटीच्या मूल्यांकनासाठी सज्ज झाले आहे. पुढील दहा दिवसांत गाव जिल्ह्यातही सर्वोत्तम ठरवण्यासाठी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा सज्ज व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पुढील टप्प्यातही सर्वांनी आपले योगदान, श्रमदान आणि अमूल्य वेळ देऊन जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार मिळवून द्यावा, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.





