Leopard Sighting : कोरेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत; सभापतींच्या आदेशाने वन विभाग खडबडून जागा
Leopard Sighting : गावागावांत बिबट्याच्या दहशतीनंतर वन विभाग सतर्क; सीसीटीव्ही कॅमेरे आणि विशेष दक्षता घेण्याचे पंचायत समितीचे निर्देश.

Leopard Sighting – कोरेगाव तालुक्यात बिबट्या व इतर वन्य प्राण्यांचा वाढता वावर शेतकरी आणि पशुपालकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश पंचायत समितीच्या सभापती रूपाली शिवाजी गुरव यांनी दिले.
यासंदर्भात कोरेगाव पंचायत समितीच्या सभापती दालनात बुधवारी वन विभागाचे अधिकारी आणि पंचायत समिती सदस्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत तालुक्यातील वाढत्या बिबट्या व वन्य प्राण्यांच्या वावराचा आढावा घेण्यात आला. तसेच वन विभागामार्फत करण्यात येणार्या उपाययोजना, जनजागृती मोहिमा आणि नुकसानग्रस्त शेतकरी व पशुपालकांना दिल्या जाणार्या मदतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
उपसभापती रवींद्र पवार, सदस्य अजिंक्य कदम, नीलेश जगदाळे, डॉ. संजय आवडे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे यांच्यासह तालुक्यातील सर्व वनपाल उपस्थित होते. वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे यांनी वन विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. सभापती रूपाली गुरव म्हणाल्या, शेळ्यांवर होणार्या हल्ल्यांमुळे अनेक पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
वन विभागाने या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत तसेच भविष्यात कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. बैठकीदरम्यान उपसभापती रवींद्र पवार व पंचायत समिती सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना वन विभागाच्या अधिकार्यांनी उत्तरे दिली. वन विभागाच्या विविध योजना, वन्य प्राण्यांमुळे होणार्या नुकसानीसाठी मिळणारी नुकसानभरपाई, मदतीची प्रक्रिया तसेच शासनाच्या विविध निर्णयांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.





