रूपगंध : कालाय तस्मै नमः

सदानंदांनी त्यांचा मुलगा राजच्या दरवाजावरची बेल वाजवली त्यावेळी रात्रीचे साडेनऊ वाजले होते. सदानंद आणि सावित्रीबाई सांगली जवळील एका छोट्याशा गावात राहत होते. सहा-सात तासांचा एसटीचा प्रवास करून पुण्याला आल्यामुळे ते दोघेही खूप थकले होते. ‘कोण पाहिजे तुम्हाला?’ स्लीवलेस टी-शर्ट आणि शॅार्ट पॅन्ट घातलेल्या तरुणीने दरवाजा किंचितसा उघडून विचारले. ‘सूनबाई, तू ओळखलं नाहीस का आम्हाला?’ ‘मी आणि सूनबाई? अहो, अविवाहित आहे मी. कोण तुम्ही? कोणाकडे जायचं तुम्हाला?’ त्या तरुणीने त्रासलेल्या स्वरात विचारले.
‘माफ करा, हे बंडूचेच घर आहे ना?’ खात्री करून घेण्यासाठी सदानंदांनी विचारले. ‘नाही, नाही येथे बंडू वगैरे कोणी राहत नाही’ असे म्हणताना त्या तरुणीने दरवाजा पूर्णपणे उघडला. ती सदानंद आणि सावित्रीबाईंची सून नव्हती. ‘आम्हाला आमचा मुलगा बंडूकडे जायचंय, अंधारामुळे आम्ही घर चुकलो, क्षमा असावी’ असे म्हणत सदानंद आणि सावित्रीबाई जायला निघाले; तेवढ्यात ‘मावशी, अगं हे माझे आजी-आजोबा आहेत’ असे म्हणत रीना आजोबांना बिलगली.
‘रीनु बेटा कशी आहेस तू? तुझे बाबा कुठे आहेत? तुझी मम्मी कुठे आहे’ विचारत सदानंद आणि सावित्रीबाई घरात शिरलेत. ‘माझे बाबा ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेलेत आणि आई आइस्क्रीम आणायला गेली, येईलच आता.’ तेवढ्यात नेहा म्हणजे रीनाची आई आली. ‘काहीही न कळवता आणि असे अचानक तुम्ही आलात, सर्व ठीक तर आहे ना?’ नेहाने विचारले. ‘ही माझी मावस बहीण, डॉक्टरेट करण्यासाठी पुण्याला आली आहे.’ नेहाने ओळख करून दिली. ‘तुमचं जेवण झालं असेलच ना? नसेल झालं तर मी करते तुमच्यासाठी स्वयंपाक’, नेहा म्हणाली. ‘घरात चिकन बिर्याणी आहे पण ती चालणार नाही ना तुम्हाला. आधी चहा करू का? की आइस्क्रीम घेता?’
‘सूनबाई आम्हाला चहा नको, जेवण नको, अगदी आइस्क्रीमसुद्धा नको. पोट अगदी गच्च भरलंय आमचं’, सदानंद म्हणाले. ‘तुम्ही तुमचं सामान या रूममध्ये ठेवा आणि इथेच झोपा’, नेहाने सांगितले. सदानंद आणि सावित्रीबाईंनी त्यांचे सामान नेहाने सांगितलेल्या रूममध्ये नेले. सावित्रीबाईंनी स्वतः खारीक खोबर्याच्या, साजूक तुपात बनवलेल्या लाडवांमधील एक लाडू रीनाला दिला. ‘सुनबाई आणि मावशी तुम्ही पण लाडू घेतात का?’ सावित्रीबाईंनी प्रेमाने विचारले.
‘नको नको, आम्ही गोड कमी खातो’ असे म्हणत नेहाने रीनाच्या हातातील लाडू ओढून घेतला. ‘आई मला लाडू आवडतो, खाऊ देना मला’ म्हणणार्या रीनावर नेहा ओरडली. ‘रीना हे लाडू काळपट दिसतात. बहुतेक खूप पूर्वी केलेले असतील तू खाऊ नकोस, त्रास होईल तुला. मी उद्या तुला समोरच्या दुकानातून ताजे लाडू आणून देईन.’ मोठ्या कष्टाने आणि प्रेमाने केले होते सावित्रीबाईंनी लाडू. मेथी आणि काळ्या मनुका घातल्यामुळे लाडू थोडेसे काळपट दिसत होते हे खरं पण ते शिळे नव्हते, त्यांनी लाडू कालच केले होते.
लाडू खायला न मिळाल्यामुळे रीना हिरमुसली आणि नेहाच्या कडवट बोलण्यामुळे सावित्रीबाई दुखावल्या गेल्या. एकेक लाडू खाऊन नी पाणी पिऊन सदानंद आणि सावित्रीबाईंनी भूक भागवली नी स्वतःला निद्रेच्या स्वाधीन केले. सकाळी सावित्रीबाईंनी चहा ठेवला. ‘सूनबाई, तुम्ही दोघी पण चहा घ्याल ना?’ त्यांनी विचारले. ‘हो, पण आम्हा दोघींसाठी बिनसाखरेचा चहा करा.’ चहा करता करता सावित्रीबाईंनी पोहेदेखील बनविले. पोहे खूप तिखट आणि तेलकट आहेत असे म्हणत नेहा आणि तिच्या बहिणीने पोहे खाल्ले नाहीत आणि रीनालाही खाऊ दिले नाहीत.
‘राज ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेला आहे, तो 4 दिवसांनी परत येईल’, नेहाने सांगितले. ‘सूनबाई, पांडुरंगावरची सिरीयल आहे, आम्हाला टीव्ही लावून दे ना’, सावित्रीबाईंनी विनंती केली. ‘टीव्ही खराब झाला आहे, मी मेकॅनिकला बोलावले आहे’, नेहा म्हणाली. ‘आजोबा, मला ती परीची गोष्ट सांगा ना’, रीनाने हट्ट धरला. सदानंद गोष्ट सांगू लागले. ‘बाबा, ती इंग्रजी शाळेत शिकते, तिला मराठी गोष्ट सांगू नका. तिचे इंग्रजी बिघडेल ना.’ सदानंदांच्या उत्साहावर विरजण पडले, रीनाही हिरमुसली.
दुपारी दोघी बहिणी पार्लरला गेल्या. ‘आजी मला सरबत करून दे ना, तू आणि आजोबा पण घ्या.’ सावित्रीबाईंनी सरबत बनविले. ‘मला हा पिटुकला ग्लास दे, हे दोन मोठे ग्लास तुमच्यासाठी आहेत. आई म्हणाली, आजी-आजोबांना खोकला आहे, त्यांनी वापरलेले ग्लास आपण वापरायचे नाही. सकाळी टीव्ही मेकॅनिक आला होता. आईने त्याला 4-5 दिवसांनी यायला सांगितले आहे. पुढच्या आठवड्यात माझे दुसरे आजी-आजोबा येणार आहेत’, रीना सांगत होती. ‘रीना, ते तुला गोष्टी सांगतात का? तुझ्या बरोबर खेळतात का?’ ‘अजिबात नाही, सारखे टीव्ही बघतात, फोनवर बोलतात आणि मला उगाचच रागावतात.’
रात्री काही शर्ट्स नेहाने सदानंदांना दाखवलेत. शर्ट्स खूपच छान होते. बोलता बोलता नेहा म्हणाली, ‘माझ्या बाबांनी थोडेच दिवस वापरलेले हे शर्ट्स अजूनही नव्या सारखेच आहेत. बाबा म्हणालेत तुमच्या वॉचमनला दे. इतके चांगले शर्ट्स का वॉचमनला द्यायचे? तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही घ्या.’ ‘नको, नको, माझ्याकडे खूप कपडे आहेत’ असे म्हणताना सदानंदाचे डोळे पाणावलेत.
सावित्रीबाई आल्यापासून नेहाने घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावर टाकली. ती स्वतः मात्र तिच्या बहिणीशी गप्पागोष्टी करण्यात मग्न असायची. सदानंद आणि सावित्रीबाईंना हे खटकत होतं परंतु त्यांनी ठरविले की मुलगा येण्याची वाट पहायची. कारण त्यांना त्याच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे होते.
संध्याकाळी राजचा शाळेतील मित्र आला. ‘काका, काकू, कसे आहात तुम्ही? किती दिवसांनी भेटता आहात? काकू, तुमच्या हातच्या खारीक खोबर्याच्या लाडवांची चव अजूनही आठवते मला. अगदी कमाल असायचे.’ निघताना सावित्रीबाईंनी दिलेली लाडवांची पिशवी त्याने आनंदाने घेतली. ‘नेहा वहिनी, काका-काकूंना माझ्या घरी नक्की घेऊन या’ असे आग्रहाचे निमंत्रण त्याने दिले.
रात्री नेहाने सदानंदांना एक मोबाइल दाखविला. ‘हा मोबाइल माझ्या भावाने दुबईहून आणला आहे. या मोबाइलची किंमत भारतात 25000/- रुपये आहे. माझा भाऊ हा मोबाइल 15000/- रुपयांना विकतो परंतु तुम्हाला म्हणून 10000/- रुपयांत मिळेल. घ्यायचा का तुम्हाला?’ ‘सूनबाई, मोबाइल खूप छान आहे परंतु माझ्याकडे एवढे पैसे नाहीत गं.’ सदानंद आणि सावित्रीबाई रूममध्ये गेलेत नी मागोमाग रीनाही आली. ‘आजोबा, तुम्हाला पैसे कमी पडत असतील तर माझ्या मनीबँकेतील पैसे घ्या.’ सदानंदांनी डोळ्यांतील पाणी लपवत रीनाला जवळ घेतले.
चार दिवसांनी संध्याकाळी राज आला. ‘आपल्या मुलाला बंडू म्हणू नका हं, सूनबाईला आवडत नाही’, सावित्रीबाईंनी सदानंदांना सूचना केली. आई-वडिलांची आदराने चौकशी करत राजने त्यांच्याशी छान गप्पा मारल्याने दोघांनाही आनंद झाला. पुण्याला आल्यानंतर त्यांना आज प्रथमच छान झोप लागली. ‘बेटा, तुझ्या आईची ही औषधे 1-2 दिवसात आण’, सदानंदांनी मोठ्या अधिकाराने राजला सांगितले. ‘आपल्या बिल्डिंग समोरच तर मेडिकल स्टोअर्स आहे. तुम्हीच आणा ना’, राजच्या बोलण्यात उद्धटपणा होता. ‘अरे, खरंच की, आणेन मी’, दुखावलेला बाप म्हणाला. काल संध्याकाळी खूप प्रेमाने वागणारा राज एका रात्रीत बदलला होता.
दुसर्या दिवशी दुपारी मुलाशी काही तरी महत्त्वाचे बोलायचे म्हणून सदानंद हॅालमध्ये बसले होते. आज त्यांचा वाढदिवस होता, हे त्याच्या नक्की लक्षात असेल, त्यांना खात्री होती. तुम्ही स्वतःहून सांगू नका असे सावित्रीबाईंनी त्यांना सकाळीच बजावले होते. रीना राजच्या फोनशी खेळत होती. ‘आजोबा हा फोन तुमच्याकडे ठेवा, मी आलेच’ असे म्हणत ती बाल्कनीत गेली. तेवढ्यात राज बाहेर आला आणि त्याने सदानंदांकडून फोन घेतला. फोनवर दोन मिस कॉल होते, राजच्या बॅासचे. फोन का वाजला नाही? राजने नीट बघितले आणि त्याच्या लक्षात आले की फोन म्यूटवर होता. ‘काय केले बाबा तुम्ही? माझी नोकरी घालवायची का तुम्हाला? अहो, तुमच्यामुळे माझे दोन महत्त्वाचे कॉल मिस झाले.’ आपण काय चूक केली ते सदानंदांना समजले नाही. (क्रमशः)





