रुपगंध: सलाम

आम्हाला खरं तर प्रश्न पडला असेल ना, इथे हा “सलाम’ कशाला? कदाचित चाळीतल्या चाणाक्ष मंडळींनी ओळखलंदेखील असेल. माणसाच्या मनातली आगतिकता अचूक अधोरेखित करत अनेक “सलाम’ घातलेल्या कविवर्य मंगेश पाडगावकरांना माझा सलाम.
चाळीतल्या सार्वजनिक नळाचा अविभाज्य भाग असलेल्या सार्वजनिक शौचालयाने महान कवी मंगेश पाडगावकरांनाही “सलाम’ या आपल्या दीर्घ काव्यात आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे. अशा या चाळीतल्या सार्वजनिक शौचालयांना हा सलाम. अनेक अत्याचार सहन करून मुकाट्याने आपले काम बजावणाऱ्या या बापुड्याना सलाम.
तुम्ही म्हणाल, आता हे लिखाण फारच भरकटत चालले आहे. पण मंडळी, ज्यांनी आपले उभे आयुष्य चाळीत काढले आहे त्यांना या गोष्टीचे फारसे अप्रूप वाटणार नाही. नाही म्हणायला नवीन पिढीला सार्वजनिक शौचालय ही संकल्पना आउटडेटेड वाटली तरी त्या काळी घरात माणसांना राहाण्याच्या जागेची अडचण असताना घरात शौचालय ही चैन परवडणारी नव्हती आणि ती चैन परवडली असती तरी तशी ती करण्याची सोयही नव्हती.
चाळ संस्कृतीत वाढलेल्या अनेकांना आज सार्वजनिक शौचालयाकडे मागे वळून पाहताना आपण राहत असलेल्या चाळीतल्या या भागाच्या आठवणीने आपसूक नाक दाबायची इच्छा होणार, हे कटू असले तरी सत्य आहे.
मानवी इतिहासात प्रत्येक कालखंडात जगण्याच्या काही विशिष्ट पद्धती असतात. त्या त्या कालखंडात माणूस त्या पद्धतीनेच वागत असतो. कितीही विसरायच्या म्हटल्या तरी या पद्धती विसरणे अशक्य असते. चाळ संस्कृतीत सार्वजनिक नळाचा अविभाज्य भाग असलेली ही शौचालये मानवी संस्कृतीचा एक अविभाज्य भागच होता.
ब्राह्मे मुहूर्ते उत्तीष्ठ्ये
जीर्णाजीर्णनिरुपयेत
आयुर्वेदाच्या या नियमाप्रमाणे उदरभरणयज्ञात रात्री टाकलेला हवीभागाचे योग्य पचन झाल्यानंतर शरीराला नको असलेला भाग बाहेर टाकला गेला नाही, तर तो अनेक व्याधींना आमंत्रण देतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आधुनिक वैद्यक शास्त्रानेही हे मान्य केले आहे.
(आजकाल लोकांना आधुनिक वैद्यक शास्त्राचे दाखले दिल्याशिवाय या गोष्टी पटत नाहीत, ही आपली शोकांतिका आहे) असो, आधुनिक बांधकाम शास्त्रात बाकीच्या घरा इतकेच किंबहुना किंचितसे जास्तच महत्त्व या जागेला दिले जाते. हे आपण सगळे जाणतोच. ज्याची सकाळ चांगली जाते त्याचा दिवस चांगलाच जातो हा नियम आजही लागू होतो. तर आपल्या चाळ संस्कृतीतल्या माणसांच्या दिवसाची सुरुवात कशी होत होती ते बघणे फारच वाचनीय आहे.
इंग्रजांनी देशाला दिलेल्या चांगल्या-वाईट अनेक देणग्यांपैकी ही एक देणगी. तोवर “होल वावर इजअवर’ हाच संकेत संपूर्ण देशात पाळला जात होता. इंग्रजांच्या आगमनानंतर औद्योगिक क्रांतीचे वारे देशात वाहू लागले. या औद्योगिक क्रांतीच्या कारणाने शहरे वसू लागली. खेड्यातला शेतकरी बेभरोशाची शेती सोडून नगद पैसा कमवायला शहराकडे धावू लागला. मुंबईत माणूस कधीच उपाशी राहत नाही हा आपला लौकिक मुंबईने तेव्हापासूनच सिद्ध करायला सुरुवात केली आणि मुंबईत येणाऱ्या माणसांच्या लोंढ्यांना सामावून घ्यायला, आकाराला यायला लागल्या त्या मुंबईतल्या चाळी. जोवर आडवा विस्तार शक्य होता तोवर बैठ्या चाळी उभारल्या.
कालांतराने मोठ्या जागेच्या अभावी एकावर एक घरे रचलेल्या चाळी उभ्या राहिल्या. या चाळी उभ्या राहताना माणसांची हक्काची “वावरे’ नामशेष झाली आणि चाळीत उभी राहिली सार्वजनिक शौचालये. चाळीच्या बांधकामात दर आठ दहा घरांच्या मागे एक शौचालय या प्रमाणात यांची निर्मिती झाली. स्वच्छतेसाठी असलेली पाण्याची निकड लक्षात घेता नळाच्या बाजूची जागा यांच्यासाठी अगदी यथायोग्य होती.
औद्योगिक क्रांतीच्या वाढीच्या वेगाचे आणि मुंबईत येणाऱ्या माणसांच्या लोंढ्याचे गणित कदाचित एखाद्या “ढ’ विद्यार्थ्याने सोडवले होते त्यामुळे त्याने चाळीतल्या बैठकीच्या गाळ्यांचा विचार बेरजेत धरला नव्हता. शिवाय कोकणातून आलेल्या चाकरमान्यांची प्रत्येक घरातल्या माणसांची संख्या या चाळी बांधणाऱ्यांच्या खिजगणतीत नव्हती. त्यामुळे एकेकाळी सम्यक वाटणारे माणसे आणि शौचालयांचे प्रमाण हळूहळू व्यस्त व्हायला लागले. त्यातून निर्माण झालेल्या अनेक समस्या मग चाळकऱ्यांना आणि या शौचालयाला भेडसावायला लागल्या. सरत्या प्रत्येक दिवसागणिक आपल्या कुवतीपेक्षा अतिरिक्त भार या शौचालयांना सोसण्याची वेळ येऊ लागली.
चाळीत माणसांची संख्या वाढू लागली तशी सकाळी येणाऱ्या नळाच्या आधीपासूनच इथे माणसांची वर्दळ सुरू व्हायला लागली. शौचालयांच्या बाहेर टमरेलाच्या लायनी सकाळपासूनच लागू लागल्या. आत गेलेल्या इसमाने बाहेरच्या माणसांची कळ लक्षात घेऊन विनाविलंब आपली डिलिव्हरी पूर्ण करून बाहेर यावे, अशी अपेक्षा प्रत्येकजण करू लागला.
आदल्या रात्रीचे हिशोब करायला ज्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ लागत असे त्यांच्या दरवाजावर सुरुवातीला बाहेरून हळूच टकटक व्हायला लागली. यानंतरही आतल्या माणसाचा ताळा नाहीच जमला तर सरळसरळ दारांवर जोरजोरात थापा मारायला सुरुवात होत असे. कधीकधी या माराने शौचालयांचा दरवाजा राम म्हणतो की काय, अशी भीती वाटत असे. काही महाभाग असेही होते की ज्यांचा हिशोब या थापा ऐकल्याशिवाय पूर्ण होतच नसे.
दरवाजावरच्या या थापा ऐकल्या म्हणजे त्यांच्या डिलिव्हरी सिस्टिमला ग्रीन सिग्नल मिळे आणि त्यांची अडलेली वाट मोकळी होत असे. दरवाजावरच्या या थापाचा उल्लेख प्रसिद्ध लेखक राम नगरकरांनी आपल्या “रामनगरीत’ केला आहे, हे सूज्ञ वाचकांना आठवत असेलच. अशाच आशयाचा एक सीन कमला हसनच्या “पुष्पक’ या मूक सिनेमातही आहे.
हे असे अनन्वित अत्याचार सहन करत ही शौचालये मुकाट्याने या अडलेल्या माणसांची सुटका करत. पण कुवतीच्या बाहेर काम केल्यानंतर कधीतरी शक्तीचा कडेलोट हा होणारच आणि शौचालयांच्या शक्तीचा कडेलोट झाला की चाळीतला सफाई कामगार येईपर्यंत त्या शौचालयाला तात्पुरते बंद ठेवावे लागे. अशाच बंद शौचालयांची आगतिकता दाखवताना पाडगावकरांनी हा “सलाम’ केला आहे.
सगळ्याच चाळीत कायमस्वरूपी सफाई कर्मचारी उपलब्ध होते. सगळ्या शौचालयाची साफसफाई करण्याचे काम रोज करीत असत. शौचालयांच्या आतल्या भिंतीबद्दल तुम्हाला काय सांगावे. त्याच्या बद्दल जेवढे बोलावे तेवढे थोडेच आहे. दरवाजाच्या आतली बाजू म्हणजे “बीबीसी’चा बातमी फलक. चाळीत सुरू असलेली सगळी लेटेस्ट लफडी समस्त चाळकऱ्यांना या बातमी फलकावर वाचायला मिळत.
फेसबुकाच्या निर्मात्यानेही बहुदा आयुष्यात फेसबुक सुरू करण्यापूर्वी या सार्वजनिक शौचालयांचा वापर नक्कीच केला असणार आहे. त्याशिवाय फेसबुकावर आपण जे पोस्ट करतो त्या जागेला “वॉल’ म्हणण्याची आयडीयेची कल्पना त्याला सुचलीच नसती. या शौचालयात बसलेल्या माणसांना एवढा वेळ कसा मिळतो, हा प्रश्न त्यावेळी प्रत्येक जण एकमेकांना विचारत असणार. सध्या फेसबुकाच्या वॉलवर संदेशांची जी विविधता अनुभवायला मिळते आहे. त्याच्या पेक्षा वैविध्य त्या वॉलवर पाहायला मिळत असे.
खजुराहोच्या शिल्पकलेतल्या प्रमाणबद्धतेने शौचालयाच्या भिंतीवर चितारलेली चित्रे भल्या भल्या चित्रकारांना मागे टाकतील. ही चित्रे चितारताना उपलब्ध होईल त्या माध्यमाने चितारली असत हे या चित्रकारांचे कसब होते. पेन्सिल, खडू, कोळसा, दगड कशाचाही विधिनिषेध या चित्रकारांना नव्हता. मिर्झागालिबही आपली मान शरमेने खाली घालील अशी शायरी त्या वॉलवर अवतरत असे. कधीकधी आपल्या मैत्रिणीला उद्याचे भेटण्याचे ठिकाणही याच जागेवर सांकेतिक भाषेत कळवले जायचे. या जागेचा हा असाही उपयोग होऊ शकतो ही केवळ कविकल्पनाच असू शकते नाही?
– डॉ. नरेंद्र कदम





