Operation Sindoor : सेनेच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबतच.! ऑपरेशन सिंदूरवर काँग्रेसच मोठं वक्तव्य

Operation Sindoor – पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर काँग्रेसने कार्यसमितीची आपत्कालीन बैठक बोलावली होती. यामध्ये काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते सहभागी झाले.
या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आम्ही सैन्यातील शूर सैनिकांना सलाम करतो, आम्ही दहशतवादाविरुद्ध सरकारसोबत उभे आहोत.
खर्गे म्हणाले, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर धाडसी आणि निर्णायक कारवाई करून योग्य उत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे.
आमच्या शूर सैनिकांच्या धाडसाला, दृढनिश्चयाला आणि देशभक्तीला आम्ही सलाम करतो… दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या दिवसापासूनच काँग्रेसने लष्कर आणि सरकारसोबत एकता दाखवली आणि सीमापार दहशतवादाविरुद्धच्या प्रत्येक निर्णायक कारवाईला पाठिंबा दिला.
दरम्यान, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांनी लिहिले आहे की, आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा खूप अभिमान आहे. आमचे शूर सैनिक आमच्या स्वातंत्र्याचे आणि अखंडतेचे रक्षण करतात. देव त्यांचे रक्षण करो आणि त्यांना धैर्याने आणि शौर्याने आव्हानांना तोंड देण्यासाठी अपार धैर्य देवो. जय हिंद.





