पुणे जिल्हा : जेजुरीत अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन

पुष्पहार अर्पण करून बेल भंडारा वाहुन केली पुष्पवृष्टी
जेजुरी – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी (300 व्या) जयंती निमित्त श्री मार्तंड देवसंस्थांन जेजुरी यांच्या वतीने जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व जेजुरी परिसरातील ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, पुजारी वर्ग नित्यसेवेकरी वर्ग व कर्मचारी वर्ग यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या महाद्वार पायरी मार्गावरील पूर्णाकृती पुतळ्याजवळ आमदार विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे व श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते, विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे, अॅड. विश्वास पानसे, अनिल सौंदडे व पोपट खोमणे या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बेल भंडारा वाहुन पुष्पवृष्टी करण्यात आली.
तसेच त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून विश्वस्त मंडळाकडून 300 विद्यार्थिनींचे कन्या पूजन करण्यात आले व त्यांना शालेय साहित्यचे वितरण करण्यात आले. यावेळी देवसंस्थानच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे केवळ एक राज्यकर्त्या नव्हे, तर एक विचार, एक चळवळ, आणि स्त्री सक्षमीकरणाचे प्रतीक आहे.
– विजय शिवतारे, आमदार





