Rupee vs Dollar | रुपयाची घसरण थांबता थांबेना, सरलेल्या वर्षात तीन टक्क्यांनी झाले अवमूल्यन…

मुंबई – इतर सर्व चलनाच्या तुलनेत डॉलर वधाारत असतानाच भारतीय भांडवल बाजारातून परकीय गुंतवणूक एकतर्फी परत जात असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव कायम आहे. मंगळवारी रुपयाचा दर पुन्हा 13 पैशांनी कोसळून 85 रुपये 65 पैसे प्रति डॉलर या ऐतिहासिक निचांकी पातळीवर गेला. सरलेले वर्ष रुपयासाठी अत्यंत खराब गेले. या वर्षात रुपयाचे तीन टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे.
29 डिसेंबर 2023 मध्ये रुपयाचा भाव 83 रुपये 16 पैसे प्रति डॉलर होता. आता हा भाव 85 रुपये 65 पैसे प्रति डॉलर या पातळीपर्यंत गेला आहे. विश्लेषकांनी सागितले की, आगामी काळात रुपयांच्या मूल्यावर दबाव कायम राहणार आहे. महिना अखेरमुळे डॉलरची मागणी आयातदाराकडून वाढली आहे, इतर चलनाच्या तुलनेत डॉलर मजबूत होत आहे. त्यातच खनिज तेलाच्या किमती वाढत आहेत.
या सर्व बाबींचा रुपयांच्या मूल्यावर परिणाम अपेक्षित आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून भारतीय भांडवल बाजारातून गुंतवणूक काढून घेतली जात आहे आणि ती डॉलरकेंद्री वित्तीय उत्पादनामध्ये गुंतविली जात आहे. त्यात अमेरिकेच्या कर्जरोख्याचा समावेश आहे. त्यामुळे भारताकडील परकीय चलन साठा कमी होत आहे. दोन महिन्यात रिझर्व बँकेने रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी 50 अब्ज डॉलर खर्च केले असल्याचे बोलले जाते. मात्र एकूण परिस्थिती पाहता आणखी काही प्रमाणात रुपयाचे अवमूल्यन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रुपया आपोआप संतुलित पातळीवर स्थिर होईल असे काही विश्लेषकांनी सांगितले.
Share Market : सरलेले वर्ष ठरले मोठ्या चढ-उताराचे, अखेरच्या दिवशीही झाली शेअर बाजारात विक्री…
दरम्यान, आयातीसाठी आता आयातदारांना जास्त रुपयेे मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीत आयात महागात पडून देशातील आयात केलेल्या मालाच्या किमती वाढत आहेत. महाग खनिज तेलामुळे एकूणच वाहतुकीचा खर्च वाढून चलनवाढ होण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे समजले जाते.



