Rupee vs Dollar: जागतिक घडामोडी आणि परदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्यामुळे भारतीय रुपयाची घसरण थांबता थांबत नाहीये. सोमवारी रुपयाने ९५.२० चा स्तर गाठून ऐतिहासिक नीचांक नोंदवला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) चलनातील अस्थिरता रोखण्यासाठी अनेक पावले उचलली असली, तरी रुपयावरचा दबाव कायम आहे. आरबीआयचे निर्बंध ठरले तोकडे शुक्रवारी उशिरा आरबीआयने बँकांसाठी परकीय चलन व्यवहारांवर कडक मर्यादा घातल्या होत्या. बँकांना त्यांच्या व्यवहारातील निव्वळ मर्यादा १०० दशलक्ष डॉलरपर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी १० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बाजारातील सट्टेबाजी कमी करणे आणि रुपयाला सावरणे हा यामागील उद्देश होता. मात्र, या निर्णयाचा सकारात्मक परिणाम केवळ काही काळापुरताच दिसून आला. रुपयावर दबाव का वाढतोय? रुपयाची ही घसरण होण्यामागे मुख्यत्वे खालील तीन कारणे मानली जात आहेत. इराण युद्ध आणि कच्च्या तेलाचे दर: इराण युद्धाच्या संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करत असल्याने देशाचे आयात बिल वाढले आहे, ज्याचा थेट परिणाम रुपयावर होत आहे. हेही वाचा – शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 1636 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले परदेशी गुंतवणूकदारांची माघार: जागतिक अनिश्चिततेमुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेत आहेत. यामुळे डॉलरची मागणी वाढली असून रुपया कमकुवत झाला आहे. शेअर बाजारातील पडझड: रुपयाच्या घसरणीसोबतच शेअर बाजारातही मोठी विक्री झाली. सोमवारी ‘निफ्टी ५०’ मध्ये सुमारे २ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. मार्च २०२० नंतरची ही एका महिन्यातील सर्वात मोठी घसरण ठरण्याची शक्यता आहे. १० वर्षांतील निचांकी कामगिरी – चालू मार्च महिन्यात रुपयामध्ये तब्बल ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. गेल्या सात वर्षांतील ही रुपयाची एका महिन्यातील सर्वात खराब कामगिरी आहे. दरम्यान, जोपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती कमी होत नाहीत किंवा परदेशी गुंतवणूक पुन्हा सुरू होत नाही, तोपर्यंत रुपयावरचा हा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. ‘आर्बिट्रेज ट्रेड्स’ (वेगवेगळ्या बाजारांतील किमतीच्या फरकाचा फायदा घेणारे व्यवहार) कमी करण्यासाठी बँका आता डॉलर्सची विक्री करतील, अशी अपेक्षा आहे, परंतु त्याचे परिणाम दीर्घकालीन असतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.