Rupee Record Low : डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी 96.35 वर; महागाई वाढीची शक्यता
Rupee record low: विदेशी चलन व्यापार्यांच्या मते, जागतिक स्तरावरील अनिश्चितता आणि अमेरिका-इराण तणावामुळे गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढला आहे. यामुळे डॉलर मजबूत होत असून उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या चलनांवर दबाव वाढत आहे.

Rupee record low : भारताच्या चलनबाजारात सोमवारी रुपयाची घसरण कायम राहिली असून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी 96.35 वर बंद झाला. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिका-इराणमधील भू-राजकीय तणाव आणि मजबूत डॉलरमुळे रुपयावर दबाव वाढल्याचे विदेशी चलन बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले.
आंतरबँक विदेशी चलन बाजारात रुपया 96.19 वर खुला झाला. व्यवहारादरम्यान तो आणखी घसरत 96.39 या पातळीपर्यंत पोहोचला. अखेरीस दिवसअखेर रुपया 54 पैशांनी घसरून 96.35 (तात्पुरता) या विक्रमी नीचांकी स्तरावर बंद झाला. शुक्रवारीही रुपया प्रथमच 96 प्रति डॉलरच्या खाली घसरून 95.81 या सर्वकालीन नीचांकी स्तरावर बंद झाला होता.
विदेशी चलन व्यापार्यांच्या मते, जागतिक स्तरावरील अनिश्चितता आणि अमेरिका-इराण तणावामुळे गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढला आहे. यामुळे डॉलर मजबूत होत असून उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या चलनांवर दबाव वाढत आहे.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम –
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत 0.65 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 109.97 डॉलरवर पोहोचली. भारतासारख्या तेल आयातदार देशांवर याचा थेट परिणाम होत असून डॉलरची मागणी वाढल्याने रुपयाची घसरण तीव्र होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
RBI हस्तक्षेपाची शक्यता –
Reserve Bank of India (RBI) हस्तक्षेप करू शकते, तसेच सोने-चांदी आयातीवरील निर्बंधांमुळे रुपयाला काही प्रमाणात आधार मिळू शकतो, असे मिराए अॅसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांनी सांगितले. त्यांच्या मते, डॉलर-रुपया विनिमय दर 96 ते 96.60 या दरम्यान राहू शकतो.
विदेशी चलन साठ्यात वाढ –
दरम्यान, 8 मे रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या विदेशी चलन साठ्यात 6.295 अब्ज डॉलरची वाढ होऊन तो 696.988 अब्ज डॉलरवर पोहोचल्याची माहिती RBI ने दिली. त्याआधीच्या आठवड्यात विदेशी चलन साठ्यात 7.794 अब्ज डॉलरची घट झाली होती.
सरकारचे आयात नियंत्रण उपाय –
केंद्र सरकारने नुकतेच सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 6 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. तसेच चांदीच्या आयातीवर परवाना प्रणाली लागू करत आयात निर्बंधही घातले आहेत. परकीय चलनाचा ओघ कमी करण्यासाठी आणि अनावश्यक आयात रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
रुपया घसरण्याचे फायदे-तोटे –
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यास आयात महाग होते. विशेषतः कच्चे तेल, इलेक्ट्रॉनिक्स, सोने यांची किंमत वाढल्याने महागाई वाढू शकते. परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि विदेश प्रवास करणाऱ्यांचा खर्चही वाढतो. उद्योगांना आयातीसाठी अधिक डॉलर मोजावे लागतात. मात्र, रुपया घसरण्याचा काही क्षेत्रांना फायदा होतो. आयटी, फार्मा आणि निर्यातदार कंपन्यांना डॉलरमध्ये अधिक उत्पन्न मिळते. परदेशातून भारतात पैसे पाठवणाऱ्या भारतीयांना अधिक रुपये मिळतात. पर्यटन क्षेत्रालाही फायदा होऊ शकतो, कारण परदेशी पर्यटकांसाठी भारत तुलनेने स्वस्त ठरतो.





