Rupali Chakankar : २८ दिवसांनंतर रुपाली चाकणकरांनी मौन सोडलं; खरात प्रकरणावर केला मोठा खुलासा
Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात नाव आल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Rupali Chakankar : नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नाव जोडले गेल्यानंतर तब्बल २८ दिवस मौन राखल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्यावर आणि कुटुंबावर करण्यात येणारे सर्व आरोप निराधार व हेतुपुरस्सर असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
चाकणकर म्हणाल्या की, “माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर गेल्या काही दिवसांपासून बेछूट व कपोलकल्पित आरोप केले जात आहेत. मात्र आजपर्यंत कोणत्याही आरोपांसाठी ठोस पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत.” माध्यमांनीही आरोप करणाऱ्यांकडून पुरावे मागितले नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
निनावी पत्राच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, असे पत्र नेमके कुठून आले आणि ते माध्यमांपर्यंत कसे पोहोचले? कोणतीही शहानिशा न करता या पत्राच्या आधारे चर्चांना उधाण आणले गेले, यामागील सूत्रधार समोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. संबंधित पत्राला कायदेशीरदृष्ट्या महत्त्व नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केल्याचे त्यांनी नमूद केले. (Rupali Chakankar)
खरात प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा पुनरुच्चार करत चाकणकर म्हणाल्या की, “या प्रकरणातील कोणत्याही आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहार किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कृतीशी आमचा दूरदूरपर्यंत संबंध नाही.” सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच, गेल्या काही दिवसांत प्रसारमाध्यमांमध्ये आपल्याविरोधात एकतर्फी बातम्या प्रसारित होत असल्याचे सांगत, आपण जाणीवपूर्वक मौन पाळले होते, जेणेकरून तपास यंत्रणांना निष्पक्षपणे चौकशी करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Rupali Chakankar)






