रुपाली विरुद्ध रुपाली! ‘एकाच महिलेला किती पदे देणार?’; अजित पवार गटातील अंतर्गत वाद समोर

Rupali Patil Thombar Vs Rupali Chakankar| उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेच्या जागेवरुन अंतर्गत वाद सुरु झाल्याचे दिसत आहे. रखडलेल्या विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत.
राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. यातच आता विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना संधी देण्यास विरोध केला जात आहे.
एकाच महिलेला किती पदे देणार? असं म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत इतर महिलांना समान संधी द्यायला हवी, असं म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली विरुद्ध रुपाली असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुपाली पाटील विरुद्ध रुपाली चाकणकर असा वाद रंगला आहे.
रुपाली पाटील ठोंबरे विरुद्ध रुपाली चाकणकर
“एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे मा.अजित दादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? काल पासून बातमी वाचत आहे, बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी. ही विनंती असेल,” असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा:
अपर्णा यादव भाजप सोडण्याच्या तयारीत? ; सपाच्या ‘या’ दिग्गज नेत्याशी साधला संपर्क





