Donald Trump – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत उलट सुलट चर्चा सुरू असतानाच रविवारी सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या मृत्यूची अफवा पसरली. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयीचे अनेक संदेश पोस्ट व्हायला लागले. त्यामध्ये ट्रम्प यांच्या प्रकृतीविषयी वेगवेगळे दावे केले जाऊ लागले होते. ट्रम्प यांना रीड रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे त्यामध्ये म्हटले जात होते. एक्स हॅन्डलवर पसरलेल्या पोस्टमध्ये वापरकर्त्याने स्वतःची ओळख अमेरिकेतील शास्त्रज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोग्य अर्थतज्ज्ञ अशी दिली आहे. त्यातच ट्रम्प आज प्रसार माध्यमांसोर येणार नाहीत, असेही व्हाइट हाउसने स्पष्ट केले. त्यामुळे या अफवांना आणखी धार चढली. ट्रम्प नेहमी आठवड्याच्या अखेरीस फ्लोरिडा येथील मार-ए-लागो येथील गोल्फ क्लबमध्ये गोल्फ खेळण्यासाठी जात असतात. पण ते वॉशिंग्टनमध्येच असल्यामुळे माध्यमांपासून दूर राहण्याचे कारण इतर काही नसून ट्रम्प यांची प्रकृती हेच असल्याचा अंदाज अनेक नेटिझन्सकडून वर्तवला जाऊ लागला होता. इराणमध्ये बेपत्ता झालेल्या अमेरिकेच्या हवाई दलाच्या वैमानिकाच्या शोधासाठीची मोहिम तीव्रपणे राबवली जात असल्यामुळेच ट्रम्प माध्यमांसमोर येणार नव्हते. पण नंतर हा वैमानिक सापडला असल्याचे स्वतः ट्रम्प यांनीच सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले. इराणला दिलेल्या धमकीचा पुनरुच्चारही त्यांनी एका अन्य पोस्टमध्ये केला. मात्र व्हाइट हाउने हे दावे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. ही अफवा म्हणजे वेड्या उतारमतवाद्यांनी केलेले कारस्थान असल्याची टीका व्हाइट हाउसने केली आहे. जेंव्हा ज्यो बायडेन कोणतीही पूर्वसूचना न देता १२ दिवस माध्यमांपासून दूर रहात होते, तेंव्हा कोणीही काहीही का म्हणत नव्हते? अध्यक्ष ट्रम्प काम करणे कधीही थांबवत नाहीत, याबद्दल काळजी नसावी, असे व्हाइट हाउसच्या निवेदनात म्हटले आहे.