पुणे – नांदेड सिटीमध्ये असलेल्या ‘मधुवंती’ सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडून महिलेसह तिच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वाहनाला स्टिकर नाही, म्हणून फ्लॅट मालकाला शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर जाब विचारल्यावर आई व मुलाला मारहाण करण्यात आली. याबाबत ४२ वर्षीय महिलेने नांदेडसिटी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, नांदेड सिटी टाउनशिप सिक्युरिटीच्या अश्विनी नामक महिला, नेवरेकर नावाच्या व्यक्तीसह ८ ते १० सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महिलेसह मुलाने सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ व मारहाण केली. याबाबत सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. एकुण परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही घटनांचे व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. ही घटना ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ४.३० वाजता घडला आहे. फिर्यादी महिला या त्यांच्या पती आणि २ मुलांसह १० वर्षांपासून मधुवंती सोसायटीमध्ये राहतात. फिर्यादीचे पती घटनेच्या वेळी सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आले. मात्र, गाडीला स्टिकर नसल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवुन ठेवले. तेव्हा फिर्यादी मुलासह सोसायटीचे रेसीडेन्स कार्ड घेवून तेथे गेल्या. तेथे पती व सुरक्षा रक्षकांमध्ये वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी व मुलगा पुढे गेला. त्यांच्याशीही वाद घालण्यात आले. ८ ते १० सुरक्षा रक्षकांनी त्या दोघांना बेदम मारहाण केली. त्यामुळे महिलेसह कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. तर महिला आणि मुलाने सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ व मारहण केली. या प्रकरणी सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. नांदेड सिटी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव तपास करत आहेत.