RTE Admission: आरटीई प्रवेशाला यंदा विक्रमी प्रतिसाद! तब्बल ९६ हजार ९९० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
RTE Admission: राज्यभरातील ८,७०१ शाळांतील १.१४ लाख जागांसाठी आले होते पावणेतीन लाखांहून अधिक अर्ज; ऑनलाईन सोडतीने ठरले भवितव्य.

RTE Admission – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठी यंदा प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. एकूण पाच फेऱ्यांतून ९६ हजार ९९० बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांत आठ हजारांनी वाढ झाली आहे.
शालेय शिक्षण विभागाने आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी यंदा नियमांत बदल केला होता. त्यानुसार विद्यार्थ्याच्या घरापासून एक किलोमीटरच्या परिसरातील शाळेत प्रवेश बंधनकारक करण्यात आला होता. त्यानुसार नोंदणी प्रक्रियाही करण्यात आली. मात्र, या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने शिक्षण विभागाचा नियम रद्द करण्याचा आदेश दिला. त्यामुळे विद्यार्थ्याच्या घरापासून तीन किलोमीटर परिसरातील शाळा प्रवेशाची संधी पुन्हा उपलब्ध झाली.
पुन्हा अर्ज नोंदणी करून प्रवेश प्रक्रिया राबवण्यास विलंब झाला. फक्त यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील ८ हजार ७०१ शाळांतील १ लाख १४ हजार ८२६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. त्यासाठी एकूण २ लाख ८९ हजार २८६ अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठी काढलेल्या ऑनलाइन सोडतीमध्ये १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यातील ७९ हजार ८६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.
उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यासाठी चार फेऱ्या घेण्यात आल्या. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १६ हजार ७५८ प्रवेश झाले आहेत. गेल्या वर्षी सर्वाधिक ८८ हजार बालकांचे प्रवेश झाले होते. यंदा प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या ८ हजारांनी वाढली असून, आजवरचे सर्वाधिक ९६ हजारांहून अधिक प्रवेश झाले. गेल्या वर्षी सुमारे २१ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा १७ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.





