“…तर भारताला मित्रदेश बनायचंय…” ; डॉ.मोहन भागवत यांचे महत्वाचे विधान

Rss mohan bhagwat । ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या वतीने प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंग महारुद्र पूजा आणि श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये तीन दिवसीय महासत्संगाची सुरुवात झाले. या कार्यक्रमात भागवत यांनी ज्योतिर्लिंगाची पूजा केली. यावेळी बोलताना त्यांनी,”भारताला संपूर्ण विश्वाचे कल्याण करायचे आहे. हे करताना अपण जगावर उपकार करणार नाही. जगाला नवीन मार्ग दाखवल्यावर ते आपल्याला गुरू म्हणतील. पण, भारताला इतर देशांप्रमाणे महासत्ता नव्हे तर मित्रदेश बनायचे आहे, प्रामाणिकपणे जगाची सेवा करायची आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
दरम्यान, श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते पंचाहत्तरीनिमित्त भागवत यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. यानंतर भागवत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, “भगवान शंकर पवित्र आहेत. त्यांच्यावर कुठलाही कलंक लागू शकत नाही. आपले जीवनही त्यांच्याप्रमाणे सत्य आणि पवित्र राहायला हवे. हीच आपल्या पूर्वजांची शिकवण आहे. सुखी, सुंदर जग बनावे आणि त्यासाठी भारताने काम करावे, अशी जगाची इच्छा आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची एक चित्रफीत नुकतीच पाहिली. ती सत्य आहे का माहिती नाही.” Rss mohan bhagwat ।
सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकदा बनावटही येतात. या चित्रफितीमध्ये सांगितले आहे की, सध्या भारत समोर जात असून जगात क्रमांक एकचा देश बनणार आहे. त्यामुळे अमेरिका, रशिया, चीनसह सगळे चिंतेत आहेत. मात्र, ते भीतीमुळे चिंतेत नसून भारत समोर जात असताना आपण त्यांच्यासोबत कसे जुळवून घेणार याची त्यांना चिंता आहे. भारताची जनता गुणवान आणि कर्तृत्ववान आहे. आपला देश मोठा करण्यासाठी ती काम करत आहे. त्यामुळे भारतासोबत जुळवून घेण्यासाठी आम्ही काय करायला हवे, ही चिंता जगाला आहे. या चित्रफितीमुळे जग काय विचार करते, हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, याकडेही सरसंघचालकांनी लक्ष वेधले.
‘कुणी सेवा केली की उमेदवारी मागणार अशी शंका येते’ Rss mohan bhagwat ।
आपल्याला सेवा करायची आहे. सेवा करायची म्हणजे वृत्तपत्रात बातमी देणे नव्हे. सेवा केल्यावर त्याचा लाभ मागू नका. सेवा नि:स्वार्थ भावनेने असायला हवी. हल्ली कुणी खूप सेवा केली तर निवडणुकीची उमेदवारी मागणार का, अशी शंका येते, असेही डॉ. भागवत म्हणाले.





