RR vs MI : गुवाहाटीत रंगणार ‘महायुद्ध’! राजस्थान विजयाची हॅट्ट्रिक साधणार की मुंबई करणार पलटवार? पाहा ‘हेड-टू-हेड रेकॉर्ड
RR vs MI : मंगळवारी ७ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स (RR) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात हंगामातील १३ वा सामना रंगणार आहे.

RR vs MI head to head record in IPL history : आयपीएल २०२६ चा थरार आता गुवाहाटीच्या मैदानावर पोहोचला असून, मंगळवारी ७ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हंगामातील १३ वा सामना रंगणार आहे. या महामुकाबल्यात एकीकडे विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी राजस्थान सज्ज आहे, तर दुसरीकडे मुंबई पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे.
बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी आयपीएलमधील दोन बलाढ्य संघ आमनेसामने येतील. राजस्थान रॉयल्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात धमाकेदार केली असून, त्यांनी आपल्या पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सला धूळ चारली आहे. यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल यांची स्फोटक फलंदाजी राजस्थानसाठी जमेची बाजू ठरत आहे.
Fast. Faster. Jai-Bhav 🔥 pic.twitter.com/5T9IfJuWHt
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 6, 2026
आकडेवारी काय सांगते? (Head-to-Head)
राजस्थान आणि मुंबई यांच्यातील लढत नेहमीच चुरशीची राहिली आहे. आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकूण ३१ सामने झाले आहेत.
- मुंबई इंडियन्सचा विजय: १६ सामने
- राजस्थान रॉयल्सचा विजय: १४ सामने
- अनिर्णित: १ सामना
इतिहासात मुंबईचे पारडे किंचित जड असले तरी, सध्याचा फॉर्म पाहता राजस्थानचा संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे.
मुंबईला गोलंदाजी सुधारण्याची गरज –
If there’s one thing to learn from Bumrah, it’s surely this 👇https://t.co/VF1AbjcAjp
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2026
दुसरीकडे, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा प्रवास संमिश्र राहिला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मागील सामन्यात सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि रोहित शर्माच्या ३५ धावांच्या जोरावर १६२ धावा केल्या होत्या, मात्र गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. १८.१ षटकांतच दिल्लीने हे लक्ष्य गाठले होते.
त्यामुळे गुवाहाटीमध्ये मुंबईला आपल्या गोलंदाजीच्या रणनीतीत मोठे बदल करावे लागतील. सलग दोन विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या राजस्थानला घरच्या मैदानावर रोखणे मुंबईसाठी सोपे नसेल. चाहत्यांना या सामन्यात पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.





