मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय-ए) महायुतीत १२ जागा मिळाल्या पाहिजे, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून आमच्या पक्षाची भूमिका कळवली आहे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. जागावाटपावर चर्चा सुरु असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आरपीआयला महायुतीत सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजे, अशी मागणी केली आहे. विदर्भातील जागांची त्यांनी आधीच मागणी केली होती, आता मुंबईतील शिवाजीनगर, मालाड आणि धारावी या जागा आरपीआयला सोडण्याची मागणी आठवलेंनी केली. महायुतीत आम्हाला किमान १०-१२ जागा लढण्याची संधी दिली पाहिजे. विदर्भात आम्ही तीन ते चार जागांची मागणी केली आहे.