Roston Chase : रोस्टन चेसच्या हाती कसोटी संघाची कमान: ५०व्या सामन्यात भूषवणार कर्णधारपद!

Roston Chase appointed West Indies new Test captain : रोस्टन चेसची वेस्ट इंडिजचा नवा कसोटी कर्णधार म्हणून तर डावखुरा फिरकी गोलंदाज जोमेल वॉरिकनची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या २५ जूनपासून ऑस्ट्रेलिया विरूद्ध वेस्ट इंडिज तीन कसोटींची मालिका घरच्या मैदानावर खेळणार आहे. या मालिकेत चेस प्रथमच कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे.
चेस ५०व्या सामन्यात भूषवणार कर्णधारपद –
२५ जून पासून होणारी कसोटी ही रोस्टन चेसची ५० वी कसोटी असणार आहे. त्याने दोन वर्षांपुर्वी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. ब्रिजटाऊन येथे २५ जूनपासून पाहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. ही कसोटी मालिका दोन्ही संघांसाठी २०२५-२७ च्या डब्ल्यूटीसी सायकलमधील असणार आहे. सीडब्ल्यूआयने स्पष्ट केले की, चेसची निवड ही त्याच्या नेतृत्व शैली, वर्तन आणि भूमिका पाहूण करण्यात आली आहे.
शेवटचा कसोटी सामना २ वर्षांपूर्वी खेळला होता –
JUST IN: Roston Chase has been appointed as West Indies Test captain, taking over the role from Kraigg Brathwaite 🏝️ pic.twitter.com/9YaljzuVQ7
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 16, 2025
रोस्टन चेसने दोन वर्षांपूर्वी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला ४९ वा कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून वेस्ट इंडिज संघाने १३ कसोटी सामने खेळले आहेत. २०१६ मध्ये पदार्पण करणाऱ्या रोस्टन चेसने २६.३३ च्या सरासरीने २२६५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ५ शतकांचा समावेश आहे. त्याने ८५ विकेट्सही घेतल्या आहेत. चेसने यापूर्वी एका एकदिवसीय आणि एका टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचे नेतृत्व केले आहे. कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारताच चेसला ऑस्ट्रेलियाकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागेल. डावखुरा फिरकी गोलंदाज जोमेल वॉरिकन ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल.
हेही वाचा – AB de Villiers : ‘जर आरसीबी फायनलमध्ये पोहोचली, तर मी…’, एबी डिव्हिलियर्सचं RCBच्या चाहत्यांना मोठं आश्वासन
वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी काय म्हणाले?
चेसच्या निवडीवर वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी म्हणाले, ‘मी या नियुक्तीचे पूर्णपणे समर्थन करतो. आमच्या नवीन कर्णधाराने त्याच्या समवयस्कांचा आदर मिळवला आहे, या भूमिकेसोबत येणारी जबाबदारी समजून घेतली आहे आणि या संघाला पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेले नेतृत्वगुण त्याने दाखवले.’ यावेळी निवड समितीने जॉन कॅम्पबेल, टेविन इमलाच, जोशुआ दा सिल्वा, जस्टिन ग्रीव्हज आणि वॉरिकन यांची देखील चाचणी केली होती.
हेही वाचा – Shreyas Iyer : परदेशी खेळाडूंच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरने जिंकली सर्वांची मनं! VIDEO होतोय व्हायरल
३३ वर्षीय चेसने क्रेग ब्रेथवेट यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. ज्यानी मार्चमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व करताना ३९ सामने खेळल्यानंतर राजीनामा दिला होता. वेस्ट इंडिजने त्यापैकी १० कसोटी जिंकल्या आहेत. त्याचबरोबर २२ कसोटी गमावल्या आहेत. तसेच सात कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.





