रूपगंध : कोण बरोबर-कोण चूक?

– तेजस्वी दळवी
रमेश आणि सुरेश नावाचे दोन बालपणीचे शाळेतील मित्र बर्याच वर्षांनी गावात भेटले. रमेश नोकरीनिमित्त पुण्यातच स्थायिक होता. सुरेश मात्र गावाकडेच वडिलोपार्जित किराणामालाचे दुकान पहात होता. बर्याच वर्षांनी एकमेकांना भेटल्याने इतर गप्पा झाल्या. सुरेशने मुद्दा छेडला. ‘मी काही शिकलो नाही बाबा तुझ्या इतकं. अभ्यासात तर काही डोकं चालायचंच नाही आपलं. मग काय! दिलं बापानं दुकान ताब्यात. मी पण मग चांगलं कमावलं यातून. बरं चाललंय आपलं.
जास्त काही टेन्शनचं काम नाही. निवांत असतोय आता. मी पण साठ वर्षांपर्यंत दुकानात बसणार, पोराला हे सगळं शिकवणार आणि साठीनंतर सगळं पोराच्या तावडीत देऊन मी रिटायर होणार! एकदम सरळ आणि सोपं. तुझ्यासारखं नसतं जमलं गड्या आपल्याला. पण तू तर आता तिकडचाच झालास की! एवढा सगळा आटापिटा करून काय मिळालं तुला?’
रमेश इतक्या वेळ ऐकत होता. सुरेशच्या बोलण्यातील गोम रमेशच्या लगेच लक्षात आली. मग तोसुद्धा बोलता झाला. ‘खरं आहे रे तुझं. तू शिकला नाहीस. त्यामुळे तुझं काय कन्फ्युजनच नाही. एकच पर्याय पुढे दिसत होता तुला. त्यामुळे तो स्वीकारल्याशिवाय तुझ्याकडे गत्यंतरच नव्हते. आमच्यासारख्यांचं अवघड झालं. आधी अभ्यास करा, मग चांगले मार्क पाडा, पुन्हा कुठले करिअर निवडायचे यात सुद्धा संभ्रम. काही सोप्पं आणि सहजासहजी नाही झालं रे. पण एक आहे मित्रा, संधी मिळवायची आणि मिळालेली संधी घ्यायची हे मात्र मला नक्की माहीत होतं. काठावर बसून नुसतं लांबून पाण्याची मजा अनुभवण्यापेक्षा पाण्यात उतरून ते पार करून जाण्यात मला जास्त मजा वाटली. तेच मी केले. बस्सं! इतकाच फरक आहे आपल्या दोघांमध्ये. चल निघतो आता.’
समाधानाने हसतच रमेश उभा राहिला. इतका वेळ निवांत खुर्चीत टेकून बसलेल्या सुरेश पुढे सरसावून उभा राहिला. रमेशच्या हातात हात देऊन कौतुकाने त्याच्याकडे पाहू लागला. जसे तो समजत होता तसा रमेश इतका पण चुकीचा नव्हता हे त्याच्या लक्षात आले. माझे जरी कितीही बरोबर असले तरी याचा अर्थ समोरचा माणूस चुकीचा आहे असं होत नाही हे नकळतपणे पण नेमकेपणाने रमेशने त्याला जाणवून दिले होते. आपल्यालाही आयुष्यात कितीतरी अशा व्यक्ती, परिस्थिती, वेळ, ठिकाणं असतात जी आपल्याला बरोबर वाटत नाहीत. आपल्या मतानुसार काहींचे निर्णय, वागणं-बोलणं हे सर्व चुकीचे वाटते. काहींच्या व्यक्तिमत्त्वातील बदल जाणवतात. सर्व आपल्या दृष्टीने चुकीचे असते; पण म्हणजे ती माणसं चुकीची आहेत हे म्हणणं तरी योग्य कसे?
त्यामुळे आपण बरोबर याचा अर्थ असा नाही की समोरचा माणूस नक्कीच चुकीचा आहे. अनेकदा परिस्थिती, दृष्टिकोन किंवा त्यांच्यातील मूल्यांमध्ये फरक नक्कीच असू शकतो. ज्यामुळे आपण स्वतः व समोरच्या व्यक्तीमधील निष्कर्ष आणि घेतलेल्या निर्णयांवर तफावत असू शकते. कौतुक नाही करता आले, ते स्वीकारताना नाही आले तरी किमान त्याच्या भूमिकेला भडकपणे विरोध करताना एकदा तरी विचार व्हायला हवा. प्रत्येकाचा ‘पर्स्पेक्टिव्ह’ आणि ‘प्रेफरन्सेस’ वेगवेगळे असू शकतात. कोण कशाला प्राधान्य देतोय यावरच त्या व्यक्तीचे निर्णय अवलंबून असतात.
उदाहरणादाखल सांगायचे झाले तर एखादी व्यक्ती त्याचे ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून बारा-पंधरा लाखांची गाडी घेतो; पण तेवढ्याच पैशात दुसरी व्यक्ती एक छोटीशी वापरण्यायोग्य गाडी व राहिलेले पैसे इतर गोष्टींसाठीही वापरतो. म्हणजे गाडी कुठली आणि कशी घ्यायची याचा निर्णय पूर्णपणे त्या व्यक्तीच्या प्राधान्यक्रमावर अवलंबून आहे. इथे महत्त्वाचा मुद्दा हा की कुठल्याही व्यक्तीने त्याच्या आयुष्यात घेतलेला कोणताही निर्णय चुकीचा नसतो. अगदी पूर्वी भाषा विषयातील प्रश्नपत्रिका असलेल्या प्रश्नासारखा. तुम्हाला काय वाटते? हो की नाही आणि का?
इथल्या ‘का’ या प्रश्नाला सर्वात जास्त किंमत आहे. कारण काहींसाठी त्या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेल तर काहींसाठी ‘नाही’. मग तुमचे उत्तर ‘हो’ असो किंवा ‘नाही’. तुम्हाला तसं का वाटतं याचे उत्तर तुम्ही काय देता याला महत्त्व आहे. त्या उत्तराचे ‘जस्टिफिकेशन’ तुम्ही काय देता आणि तुमच्या दृष्टीने ते उत्तर कसे बरोबर आहे हे जर तुम्हाला व्यवस्थितरित्या कळत असेल तर तुम्ही बरोबर आहात.
एखाद्याने गावाकडेच काही उपजीविकेचा मार्ग शोधून आई-वडिलांबरोबर राहण्याचा निर्णय घेवो अथवा मूळ घर सोडून शहरात किंवा इतर ठिकाणी नोकरी धंद्यानिमित्त जाण्याचे ठरवो दोन्हीही निर्णय चुकीचे नाहीतच. कारण ते निर्णय घेणार्या व्यक्तीच्या प्राधान्यक्रम आणि आवडीवर हे अवलंबून आहे. एकासाठी उपयुक्त आणि बरोबर असलेला निर्णय दुसर्यासाठी तेवढाच चुकीचा असू शकतो. फक्त ते समजून घ्यायला हवं. हे म्हणजे अगदी नागपूरची संत्री जास्त चविष्ट असते की सांगलीची द्राक्षं असे विचारण्यासारखे झाले. ज्याचे उत्तर प्रत्येकासाठी एकच असेल असे अजिबातच नाही.
असे होण्याचे कारण म्हणजे बर्याचदा लोक इतरांची बाजू पडताळून न पाहता स्वतःची बाजू कशी बरोबर आहे आणि समोरचा माणूस कसा चुकीचा वागतोय हे कळत नकळतपणे जाणवून देतात. त्यामुळे मुद्दा वादापर्यंतही जाऊ शकतो. पण इथे त्या व्यक्तीने स्वतःच्या विचारांवर ठाम राहून, समोरच्याचे नीट ऐकून, त्या व्यक्तीच्या मनालाही विचारात घ्यायला पाहिजे. त्यांच्या विचारांना मान देऊन पुढे संवाद प्रत्येकजण साधू शकतो.





