रूपगंध ‘कव्हर स्टोरी’ : ‘ती’ जिंकली

– प्रा. डॉ. संजय वर्मा
अंतराळ प्रवास आणि अवकाशात दीर्घकाळ वास्तव्य करण्याबरोबरच तेथून पुन्हा भूतलावर परतणे ही एकप्रकारे अग्निपरीक्षेसारखीच प्रचंड जोखमीची कसोटी असते. आतापर्यंत अवकाश स्थानकात मुक्काम करण्यासंदर्भात अनेक विक्रम नोंदविले गेले आहेत; मात्र तांत्रिक कारणांमुळे अवकाश स्थानकात दहा महिन्यांपासून अडकून पडण्याची वेळ आलेल्या भारतीय वंशांच्या अंतराळीवर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची कहाणी संपूर्ण जगासाठी ऐतिहासिक आहे. ‘नासा’च्या मते, या नऊ महिन्याच्या काळात सुनीता आणि त्यांच्या सहकार्यांनी दीडशेहून अधिक शास्त्रीय आणि तांत्रिक प्रयोग केले. शटल अटलांटिकच्या तापमानविरोधी कवच ङ्गाटले तेव्हा त्याचे शिवणकाम करण्याचे कामही सुनीता विल्यम्स केले. त्यांची कहाणी जगातील महिलांच्या शक्तीसामर्थ्याबाबत साशंकता व्यक्त करणार्यांना, स्रियांमधील क्षमतांवर अविश्वास दाखवणार्यांना सणसणीत चपराक आहे; तर दुसरीकडे विज्ञानाच्या क्षेत्रात येणार्या कैक पिढ्यांसाठीच्या त्या प्रेरणादायी आयडॉल बनल्या आहेत.
अंतराळ प्रवास आणि अवकाशात दीर्घकाळ वास्तव्य करण्याबरोबरच तेथून पुन्हा भूतलावर परतणे ही एकप्रकारे अग्निपरीक्षेसारखीच प्रचंड जोखमीची कसोटी असते. आतापर्यंत अवकाश स्थानकात मुक्काम करण्यासंदर्भात अनेक विक्रम नोंदविले गेले आहेत; मात्र तांत्रिक कारणांमुळे अवकाश स्थानकात दहा महिन्यांपासून अडकून पडण्याची वेळ आलेल्या भारतीय वंशांच्या अंतराळीवर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची कहाणी संपूर्ण जगासाठी ऐतिहासिक आहे. त्यांचा हा काळ संयमाची परिसीमा आणि दुर्दम्य इच्छाशक्ती दाखविणारा आहे. मूळ भारतीय वंशाच्या सुनीता यांनी यापूर्वी दोनदा अंतराळप्रवास केला आहे. त्यांचे अवकाशातील संशोधन आणि स्पेस वॉक अतुलनीय ठरले आहे. पण यावेळची मोहीम ही परमोच्च जोखमीने भरलेली होती. कल्पना चावलांचा विषण्ण करणारा पूर्वेइतिहास जग विसरलेले नसल्याने सुनीता आणि विल्मोर प्रत्यक्ष भूतलावर येईपर्यंत जगाने श्वास रोखून धरला होता.
अंतराळातील प्रवास कसा राहील हे आपण ठरवत नाही, तर अंतराळ ठरवत असते. हल्ली रस्त्यावरुन प्रवास करणे जोखमीचे ठरलेले असताना गूढरम्य आणि अगणित घटकांची उकलही न झालेल्या अंतराळात झेपावणे, वास्तव्य करणे आणि सुखरूप परतणे हे केवळ आणि केवळ अद्वितीयच ! अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने हाडांची घनता कमी होते आणि स्नायू कमजोर होतात. अंतराळात वर-खाली याची जाणीव होत नाही, त्यामुळे शरीराची हालचाल समायोजित करणे कठीण होते. पृथ्वीच्या तुलनेत अंतराळात अन्न पचन आणि झोपेचे चक्र वेगळे असते, त्यामुळे शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. कुटुंबापासून दूर राहणे आणि मर्यादित जागेत राहणे यामुळे मानसिक तणाव निर्माण होतो. अंतराळ यानातील कोणतीही यंत्रणा बिघडल्यास जीवघेणे संकट उद्भवू शकते. सुनीता विल्यम्स यांच्या या विक्रमी प्रवासाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या साठीसमीप असताना त्यांनी ही अग्निपरीक्षा यशस्वी करुन दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्या धिरोदात्तपणापुढे जगाने नतमस्तक होणे स्वाभाविकच म्हणावे लागेल !
अवकाश स्थानकातील त्यांचे दहा महिन्यांपासून असणारे वास्तव्य त्यांच्यातील धैर्याची, साहसीवृत्तीची आणि पराकोटीच्या संयमाची साक्ष देणारे आहे. 5 जून 2024 रोजी या दोघांनी आठवडाभरासाठी पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर भ्रमण करणार्या अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. त्यावेळी आपल्याला दहा महिने थांबावे लागेल असे त्यांनाच काय, तर कोणालाच वाटले नव्हते. परंतु अवकाश स्थानकापर्यंत नेणार्या बोइंग स्टारलायनर या यानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या दोघांना ते परत आणू शकले नाही. यानंतर नवे यान पाठवून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे त्यास उशीर होत गेला. अखेरीस बराच काळ वाट पाहिल्यानंतर एलॉन मस्क यांचे स्पेसएक्स क्रु-10 ने त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी पुढाकार घेतला.
यादरम्यान 13 मार्च रोजी उड्डाणाचे वेळापत्रक पुन्हा बदलले गेले. परंतु 19 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 वाजता सुनीता विल्यम्स, विल्मोर आणि अमेरिकेचे निक हेग व रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांना घेऊन ड्रॅगन अंतराळयान फ्लोरिडाच्या किनार्यावर उतरले. या चार अंतराळवीरांनी 18 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सोडले. जेव्हा हे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात आले तेव्हा त्याचे तापमान 1650 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. या काळात सुमारे 7 मिनिटे संपर्क तुटला, म्हणजेच अंतराळयानाशी कोणताही संपर्क झाला नाही. अखेर ड्रॅगन कॅप्सूल वेगळे झाल्यापासून 17 तासांनी हे सर्व जण समुद्रात उतरले.
खडतर अंतराळ प्रवास….
सध्याच्या काळात अंतराळ प्रवासाला पर्यटनाचा मुलामा देण्याचा प्रयत्न काही कंपन्यांकडून केला जात असताना आणि त्यातही काही पर्यटक अवकाश प्रवास करून सुखरूपपणे पृथ्वीवर परतलेले असताना सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासारखे अनुभवी अंतराळवीर अवकाश स्थानकात अडकून पडण्याची गोष्ट अवकाश प्रवासातील अनिश्चितता आणि गुंतागुंत सांगणारी आहे. यानिमित्ताने कोलंबिया आणि चॅलेंजर शटलसारख्या दुर्घटनांची आठवण येते. परंतु पृथ्वीच्या कक्षेबाहेर जेव्हा एखादे यान आणि मानव पाऊल टाकतो तेव्हा तेथे दीर्घकाळ राहणे आणि परत येण्याचा मुद्दा देखील किती गंभीर असू शकतो, हे देखील सुनीता यांच्या घडामोडींवरून लक्षात येतो.
सुनीता आणि त्यांच्या सहकार्यांना अवकाश स्थानकात सोडणार्या स्टायरलाइनरचे पहिलेच उड्डाण होते. या मोहिमेचा एकच उद्देश म्हणजे नियमित वापरासाठी यानाची कामगिरी तपासणे. मात्र पहिल्याच प्रवासात त्याच्या प्रोपल्शन सिस्टिममध्ये हीलियम गॅसची गळती आणि यानाला वेग प्रदान करणारे काही थ्रस्टर्स बंद पडल्याने नासाच्या कार्यक्रमाला धक्का बसला. परिणामी याच यानातून त्यांना माघारी आणणे नासाला जोखमीचे वाटू लागले. मात्र स्टारलाइनर हा कोणालाही न घेता पृथ्वीवर परतला आणि त्याने सुरक्षितरित्या लँड केले. त्यामुळे या यानाची क्षमता आणि पात्रता सिद्ध झाली. तथापि, सुनीता आणि विल्मोर हे अनिश्चित काळासाठी अवकाश स्थानकात अडकून पडले.
अवकाश स्थानकात यापूर्वी अनेक अंतराळवीरांनी मुक्काम करून विक्रम प्रस्थापित केले आहेत. नासाचे अंतराळवीर पॅगी व्हिट्सन यांनी वेगवेगळ्या दिवशी अवकाशात झेप घेत एकूण 675 दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. शिवाय जेङ्ग विल्यम्स (534 दिवस), मार्क वंदे हेई (523 दिवस), स्कॉट केली (520 दिवस), शेन किम्ब्रू (388दिवस ) आणि माइक ङ्गिन्के (382 दिवस) यांनी अवकाशात राहण्याचा विक्रम केला आहे. यात एकदाच सर्वाधिक काळ अवकाश स्थानकात राहण्याचा विक्रम ङ्ग्रँक रुबियो यांनी नोंदविला असून तेथे ते सलग 371 दिवस राहिलेले आहेत. ते 27 सप्टेंबर 2023 रोजी पृथ्वीवर परतले. त्यानंतर मार्क वंदे हेई (355 दिवस), स्कॉट केली (340), ख्रिस्तिना कोच (328), पॅगी व्हिटसन (289), अँड्रु मॉर्गन (272), मायकेल लोपेज एलेग्रिया (215) आणि जेसिका मेयर (205) यांनी सलग सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ अवकाश स्थानकात व्यतित केला. मात्र ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अवकाश स्थानकात जाण्याचा आणि परतण्याचा दिवस ठरला असेल तर ठिक. मात्र सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांच्यासारखा अनुभव यापूर्वी एखाद्या अंतराळवीराला क्वचितच आला असेल.
एखाद्या बिघाडामुळे अंतराळवीर अवकाशात अडकून पडल्यानंतर तेथे स्वत:ला सावरत परिस्थितीचा सामना करणे ही बाब देखील सोपी नाही. सुनीता यांनी हा सामना करतानाच कोणताही हतबलता न दाखविता तेथून परतण्याचे वेगवेगळे मार्गही शोधण्याचे प्रयत्न केले आहेत. या आघाडीवर दोघांची स्थिर राहिलेली मानसिकता वाखणण्याजोगी आहे. अवकाश स्थानकात अडकून पडल्याने सुनीता यांची तब्येत ढासळल्याचे बोलले जावू लागले, वजन कमी झाल्याचेही म्हटले जावू लागले. मात्र त्यांनी या अङ्गवांना उत्तर देत वजन स्थिर असल्याचे सांगितले. पृथ्वीवर असताना अणि अवकाशात असताना वजनात थोडीही घट किंवा वाढ झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘नासा’च्या मते, या नऊ महिन्याच्या काळात सुनीता, विल्मोर आणि अन्य एक अंतराळीवर निक हेग यांनी एकत्र येऊन150 हून अधिक शास्त्रीय आणि तांत्रिक प्रयोग केले . वैज्ञानिक प्रयोग व तंत्रज्ञान चाचण्यांवर 900 तासांपेक्षा जास्त संशोधन केले. याशिवाय अवकाश स्थानकाची दुरुस्ती किंवा जुने उपकरण बदलणे यासारखेही कामे पार पाडण्यात आली आहेत. सुनीता विल्यम्स यांनी या काळात साडे अकरा तास स्पेस वॉक केल्याचा विक्रम केला आहे. (अवकाश स्थानकाबाहेर येऊन अवकाशात चालणे) त्यामुळे त्यांचा एकूण स्पेसवॉक 62 तास 9 मिनिटे झाला आहे. एखाद्या महिला अंतराळवीराने इतके तास स्पेसवॉक करण्याचा हा नवा विक्रम आहे. एवढेच नाही तर त्यांनी अन्य एका मोहिमेत अवकाशात मॅराथॉन देखील केली आहे.
सुनीता आणि त्यांच्या सहकार्यांनी दहा महिन्यांच्या अवकाश मुक्कामात शारीरिक, मानसिक क्षमतेची आणि कुशलतेची पावती दिली आहे. पृथ्वीपासून हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रचंड वेगाने ङ्गिरणार्या अवकाश स्थानकाला सुनीता विल्यम्स समर्थपणे सांभाळत होत्या. सुनीता यांची कामगिरी एखाद्या शास्त्रज्ञाला देखील मागे टाकणारी आहे. अवकाश प्रवास करण्यापूर्वी एखाद्या अंतराळवीराला किती कठीण चाचण्यातून जावे लागते, याची कल्पना सर्वांनाच आहे. 2006 मध्ये सुनीता यांनी अटलांटिस शटलने अवकाश स्थानकात प्रवेश केला तेव्हा त्यांनी दोन रशियन कमांडरच्या स्पेस वॉकसाठी मदत केली. अवकाशातील प्रयोगादरम्यान सुनीता यांनीअनेक नमुने गोळा केले आणि ते पृथ्वीवर आणले आहेत.
न्यूट्रिशन स्टेटस असेसमेंटसाठी रक्त आणि युरिनचे नमुने घेतले. त्यातून अवकाशातील मुक्कामादरम्यान शरीरावर होणार्या परिणामाचे आकलन होणार आहे. परतीच्या प्रवासात शटल अटलांटिकच्या तापमानविरोधी कवच जेव्हा ङ्गाटले तेव्हा त्याचे शिवणकाम करण्याचे कामही सुनीता विल्यम्स यांनी केले. एका अर्थाने तिने प्रतिकूल परिस्थितीलाच टाके घालून ती अनुकूल बनवली. अशा अनेक आव्हानांवर सक्षमपणाने मात करत सुनीता आणि त्यांचे सहकारी परतले आहेत. अंतराळात नऊ महिने राहिल्यानंतर पृथ्वीवर परतल्यावर या अंतराळवीरांना स्नायू कमजोर होणे, हाडांची घनता कमी होणे, शरीरातील द्रवांचे पुनर्वितरण आणि दिशाभान गमावण्यासारख्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सुनीता यांची ही अंतराळगाथा जगातील महिलांच्या शक्तीसामर्थ्याबाबत साशंकता व्यक्त करणार्यांना, स्रियांमधील क्षमतांवर अविश्वास दाखवणार्यांना सणसणीत चपराक आहे; तर दुसरीकडे विज्ञानाच्या क्षेत्रात येणार्या तरुणींना नवे अवकाश दाखवणार्यांसाठी सुनीता या येणार्या कैक पिढ्यांसाठीच्या प्रेरणादायी आयडॉल बनल्या आहेत.





