– अक्षय भुजबळ पैशांची गरज असल्यावर माणूस काहीही करू शकतो या विषयावर आजवर कित्येक सिनेमे आले आहेत. परंतु गरजेला भूतकाळात घडलेल्या एका घटनेची जोड देत थरार निर्माण करणारी कलाकृती म्हणजे एम एक्स प्लेअरवरील लूट कांड ही सीरिज. सीरिजच्या सुरुवातीला 1995चा कालखंड दाखवण्यात आलेला आहे. आकाशातून चाललेल्या विमानातून मोठं मोठ्या पेट्या खाली पडतात. पुरुलिया गावामध्ये पडलेल्या या पेट्यांमध्ये विविध प्रकारच्या बंदुका आणि हत्यारे असतात. यानंतर थेट वर्तमानकाळातील गोष्ट सुरू होते. लतिका (तनया मानिकतला) आणि पलाश (साहिल मेहता) या भाऊ बहिणींना आपल्या वडिलांचे घर वाचवायचे आहे. लतिका एका शाळेत स्पोर्ट टीचर म्हणून कार्यरत आहे तर पलाश शहरातील नोकरीच्या ठिकाणी घोटाळा करून गावी आलेला आहे. दोघांनाही पैशांची गरज आहे. त्यात घर देखील वाचवायचे आहे. मात्र अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही त्यांना पैशाची नड भागवता येत नाही. अशात दोघेही बँकमध्ये कॅशिअरजवळ असलेली पेटी कॅश लुटण्याचे ठरवतात. यासाठी फुलप्रूफ प्लॅन करून सोबत एका सोनी नावाच्या चिमुकलीला घेऊन बँकेतील पेटीकॅश लुटतात. लुटलेली रक्कम गरज भागवण्यासाठी कमी पडत असल्यामुळे दोघेही आणखी एका बँकेत लुटीसाठी जातात. या बँकेत लुटीसाठी खरेखुरे दरोडेखोर देखील येतात आणि झटापटीमध्ये ते बँकेतून निघण्यासाठी छोट्या सोनीला सोबत घेतात. यानंतर सुरू होतो खरा कांड. एका समस्येमधून बाहेर येण्यासाठी लतिका आणि पलाश हे एका अशा चक्रव्युव्हात अडकतात ज्यामुळे त्यांना 1995 मध्ये विमानातून पडलेली हत्यारे त्यांच्याच घराच्या खाली असलेल्या एका डॅमच्या बोगद्यामध्ये सापडतात. हे सगळं होत असताना कथेमध्ये ती हत्यारे शोधणारा गँगस्टर बर्मन (बृजभूषण शुक्ला) आणि त्याला मदत करणारा शिक्षक पिनाकी (ज्ञानेंद्र त्रिपाठी) यांची एंट्री झालेली असते. लेखन आणि पटकथा कथा सौरव डे यांची असून संवाद, पटकथा आणि दिग्दर्शन रुचिर अरुणचे आहे. एकाच वेळी घडणार्या वेगवेगळ्या कथांची चांगल्या प्रकारे गुंफण करण्यात आलेली असल्यामुळे पाहताना कथा चांगलीच रंजक वाटते. एकूण सहा भागांमध्ये सीरिजचा विस्तार झालेला असल्यामुळे प्रत्येक पात्र चांगल्या पद्धतीने उलगडलेले आहे. कथा सुरुवातीला काही प्रमाणात संथ वाटत असली तरी एकामागून एक नवनवे कांड होत असल्यामुळे पाहायला मजा येते. प्रत्येक पात्राला असलेली पार्श्वभूमी नवनवीन घटनाक्रम उलगडते यामुळे पाहणार्याचे लक्ष विचलित होत नाही. पात्राला एकमेकांमध्ये गुंतवण्यामध्ये आणि प्रत्येक घटनेत काहीना काहीतरी रंजक ट्विस्ट दिलेला असल्यामुळे थरार निर्माण होतो आणि प्रेक्षक कहाणीमध्ये रमतो. छायांकन आणि संगीत सीरिजचे छायांकन (सिनेमेटोग्राफी) कुमार सौरभ यांनी केले आहे. सध्याच्या युगातील कथेला 1995 च्या घटनेशी जोडण्यात आलेले आहे. यासाठी विविध लोकेशन्स आणि घटनाक्रम दाखवण्यात आलेले आहेत. जे की अगदी रोजच्याप्रमाणेच वाटतात. काही मोजके इन्सिडेंट वगळता व्हिज्युअली दृश्ये तितकासा प्रभाव पाडत नाहीत. अगदी त्याचप्रमाणे कांड करणार्या या सीरिजचे संगीत देखील तितकेसे लक्षवेधी ठरत नाही. यामुळे सीरिजमधील संथपणा स्पष्टपणे जाणवतो. घर वाचवण्यासाठी सुरू झालेला भाऊ बहिणीचा हा लूट कांड त्यांना आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजण्यापर्यंत घेऊन जातो. यादरम्यान दोघा भावा बहिणींची हालत इकडे आड तिकडे विहीर अशीच होऊन जाते. बँकेमधील चोरी करताना हरवलेली सोनी लतिका आणि पलाशला पुन्हा मिळते का? घराखाली सापडलेल्या हत्यारांचे पुढे काय होते? दोघे भाऊ बहीण मृत्यूच्या जबड्यात कसे अडकतात. 1995ची हत्यारे आणि त्यांच्या वडिलांचा काही संबंध असतो का? याची उत्तरे दिग्दर्शकाने लूट कांडच्या सहा भागांमध्ये स्पष्टपणे दिलेली आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘लूट कांड’च्या या पर्वाची गोष्ट संपली असली तरी शेवटी दिग्दर्शकाने दिलेली हिंट दुसर्या पर्वाकडे इशारा करते. हे दुसरे पर्व विमानातून पडलेल्या त्या हत्यारांची उकल करणारे ठरल्यास हा लूट कांड आणखी थरारक होईल यात कोणतीही शंका नाही. सीरिजचे नाव – लूट कांड उपलब्ध – एमएक्स प्लेअर दर्जा – *** (3 स्टार) का पहावी – त्याच त्याच प्रेम कथा पाहून कंटाळला असाल तर नव्या विषयाचा चांगला पर्याय का पाहू नये – एक पेक्षा अधिक भागांमधील सीरिज प्रकार पाहणे आवडत नसल्यास