पुणे – महिला गटाच्या अंतिम फेरीत केनिया संघाने इजिप्त संघाला पराभूत करताना सहाव्या विश्व करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुरुष गटातून भारत व केनिया संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियम येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत केनिया संघाने इजिप्तला 5-0 असे परभूत केले. केनिया संघाकडून व्ही साटीया (39.10 व 43.45) व कैथीन्जी (0.32 व 25.24) यांनी प्रत्येकी 2 व रोप ज्युडिथने 1 (1.32) गोल केला. इजिप्तला एकाही गोल करता आला नाही. महिला गटाचे विजेत्यांचे पुरस्कार वितरण उच्च व तंत्रशिक्षण तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष अमिताभ शर्मा, भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष मनोहर कांत, आशियाई रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष एस. एस. रॉय, भारतीय रोलबॉल संघटनेचे उपाध्यक्ष मनोज यादव, युगांडा रोलबॉल फेडरेशनच्या अध्यक्षा पेनिना काबेंगे, बेलारूस रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष अलेक्सी खाटीलेव्ह, क्रीडा भरतीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज चौधरी, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे, भारतीय रोलबॉल संघटनेचे सचिव चेतन भांडवलकर आदी यावेळी उपस्थित होते.
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये भारताने पोलंड संघावर 12-1 अशी एकतर्फी मात केली. भारताकडून इशिका शर्माने 7 (0.34, 15.25, 33.25,34.49, 35.25, 37.90 व 46.21) गोल केले. सुहानी सिंग (23.17 व 24.51) व पूजा चौधरी (10.33 व 11.12) यांनी प्रत्येकी 2 तर श्रुती भगतने (21.21) एक गोल केला. पोलंड संघाकडून सायनोविक मारियाने (44.50) एक गोल केला.
पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने इराण संघाला अतिरिक्त वेळेत 7-5 असे पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. अतिरिक्त वेळेत भारतीय खेळाडूंनी जोरदार खेळ करताना सलग 2 गोल करताना संघाला विजय मिळवून दिला.