पुणे जिल्हा | घोटावडे येथील रोकडेश्वर सोसायटीचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव

पिरंगुट, (वार्ताहर) – घोटावडे (ता.मुळशी) येथील रोकडेश्वर विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा तालुक्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल गौरव करण्यात आला. पुणे जिल्हा बँकेच्या वतीने कायमस्वरूपी ढाल देऊन सोसायटीचा गौरव करण्यात आला.
सोसायटीने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात स्वनिधी उभारणी, स्वमालकीच्या इमारत बांधणी, सभासदांना उत्तम सेवा अशा विविध कामांबद्दल हा गौरव मिळाला. अल्पबचत भवन येथे पुणे जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.
बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी आमदार रमेश थोरात, आमदार संजय जगताप, आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप आदींच्या हस्ते रोकडेश्वर विविध कार्यकारी सोसायटी घोटवडेच्या संचालक मंडळाचा सन्मान करण्यात आला. सोसायटीने खते, बी-बियाणे व शेतीपूरक व्यवसायाचा परवाना काढला आहे.
सोसायटीचे भागभांडवल ५६ लाख ९१ हजार असून इमारत निधी १३ लाख ५७ हजार,राखीव निधी २० लाख ३७ हजार ,बँकेचे भाग १० लाख ,मुदत ठेव ४४ लाख ६० हजार, नापरतीची ठेव १७ लाख, अशा आश्वासक तरतुदी आहेत.
तसेच बँक कर्ज १ कोटी २८ लाख उचलले असून स्वनिधीमुळे सभासद कर्जवाटप १ कोटी ४० लाख इतके आहे. जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी वारंवार या संस्थेला भेटी देऊन मार्गदर्शन केले.
सोसायटीचे अध्यक्ष बबन आगवणे, उपाध्यक्ष अनिल गोडांबे, पोपट भेगडे, प्रभाकर गोडांबे, रवींद्र धुमाळ, अभिजीत आमले, प्रदीप भेगडे, रूपेश गुजराती, सचिव दुंदा घायतळे,विभागीय अधिकारी सुरेश नागरे व संचालकांनी सन्मानाची ढाल स्वीकारली.





