Rohit Sharma Retirement : टीम इंडियाचा माजी वनडे कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दमदार पुनरागमन करत सर्व टीकाकारांना आपल्या खेळीतून उत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये तिसऱ्या वनडे दरम्यान आपलं 50 वं आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं. तसेच तो या वनडे सिरीजमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला आहे. यादरम्यान रोहितचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहितच्या निवृत्तीबाबत एक मोठं वक्तव्य केले आहे. काय म्हणाले दिनेश लाड? एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिनेश लाड म्हणाले, “तिसऱ्या वनडे सामन्यात रोहितने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आणि टीम इंडियाच्या विजयात त्याने ज्याप्रकारे योगदान दिलं त्यामुळे सामना मजेदार झाला. तो 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळेल आणि त्यानंतर निवृत्त होईल.” तसेच त्यांनी विराटने देखील पर्थ आणि ॲडलेड येथे सलग दोन डक झाल्यानंतर 74 रनची दमदार खेळी केल्याने त्याचेदेखील कौतुक केले. रोहितचं लक्ष वनडे वर्ल्ड कपकडे रोहितचं 2027 साली होणारा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचं लक्ष्य असल्याचं दिनेश लाड यांनी कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर सांगितलं होतं. रोहित शर्मा याचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये विजयी होण्याचं लक्ष्य होतं. मात्र दुर्देवाने टीम इंडिया क्वालिफाय करण्यात अपयशी ठरली. आता रोहितचं लक्ष वनडे वर्ल्ड कपकडे आहे, असं दिनेश लाड म्हणाले आहेत. रोहितची आंतरराष्ट्रीय कारकीर्द रोहित शर्मा याने ऑक्टोबर २०२५ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० हून अधिक सामने खेळत १९,९०० पेक्षा जास्त धावा केल्या असून, त्यात ५० शतके आणि १०० हून अधिक अर्धशतके समाविष्ट आहेत. त्याने ODI मध्ये ११,३७०+ धावा (३३ शतके, २६४ उच्चांक), टेस्टमध्ये ४,३०१ धावा (१२ शतके), तर T20I मध्ये ४,२३१ धावा (५ शतके) केले आहेत. त्याच्या नावावर वनडेमध्ये तीन डबल सेंच्युरी आणि एका वर्ल्ड कपमध्ये ५ शतके करण्याचा विक्रम आहे. तो T20I मध्ये सर्वाधिक धावा आणि षटकार मारणारा खेळाडू असून, त्याने भारताला २००७ चा T20 वर्ल्ड कप, २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी, २०२४चा T20 वर्ल्ड कप आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.