UNESCO : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा ! अंदमान आणि छत्तीसगडमधील 3 नवी स्थळे युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट
अंदमान आणि निकोबार बेटांमधील बाराटांग कार्स्ट-मड-व्होलकॅनो कॉम्प्लेक्स आणि अंदमान सबडक्शन व्होलकॅनो (नारकोंडम व बॅरन बेटे), तसेच छत्तीसगडमधील सिरपूर सांस्कृतिक आणि पुरात्त्वीय परिसर या तीन नवीन स्थळांचा युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा तात्पुरत्या (टेन्टेटिव्ह) यादीत समावेश करण्यात आला आहे.

UNESCO : अंदमान आणि निकोबार बेटांमधील बाराटांग कार्स्ट-मड-व्होलकॅनो कॉम्प्लेक्स आणि अंदमान सबडक्शन व्होलकॅनो (नारकोंडम व बॅरन बेटे), तसेच छत्तीसगडमधील सिरपूर सांस्कृतिक आणि पुरात्त्वीय परिसर या तीन नवीन स्थळांचा युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा तात्पुरत्या (टेन्टेटिव्ह) यादीत समावेश करण्यात आला आहे. अधिकृत अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली.
कोणत्याही स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणुन मानांकन मिळण्यापूर्वी त्याचे नाव युनेस्कोच्या (UNESCO) तात्पुरत्या यादीत असणे अनिवार्य असते. भारताच्या स्थायी शिष्टमंडळाने २८ सप्टेंबर रोजी ही नामांकने युनेस्कोकडे पाठवली होती. या नव्या समाविष्टासह आता भारताच्या युनेस्को तात्पुरत्या यादीत एकूण ८१ स्थळे झाली आहेत.
स्थळांची वैशिष्ट्ये :
बाराटांग कार्स्ट-मड-व्होलकॅनो कॉम्प्लेक्स (अंदमान) : हे स्थळ दक्षिण आणि मध्य अंदमानमधील बाराटांग बेटाच्या नैऋत्य भागात असून, येथे अनेक चुनखडीच्या गुहा (लाइमस्टोन केव्ह्ज) आणि सक्रिय चिखल ओकनारे ज्वालामुखी (मड व्होलकॅनो) आहेत. या परिसराचे खडकाळ भूभाग, खोल दऱ्या आणि गुहा वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
अंदमान सबडक्शन व्होलकॅनो – नारकोंडम व बॅरन बेटे : अंदमान समूहातील ही बेटे बरमा-अंदमान-जावा संकुलाच्या अंतर्गत ज्वालामुखीय पट्ट्यातील क्वॅटर्नरी काळातील एकमेव सबडक्शन ज्वालामुखी आहेत. प्रदीर्घ एकाकीपणामुळे ही बेटे नैसर्गिक संपत्ती, जैवविविधता आणि पर्यावरण बदलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी मोठे केंद्र ठरली आहेत.
सिरपूर सांस्कृतिक आणि पुरात्त्वीय परिसर (छत्तीसगड) : छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील महानदीच्या पूर्व पात्रावर वसलेले सिरपूर हे एक ऐतिहासिक आणि राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे. प्राचीन काळी शरभपुरीय आणि पांडूववंशी राजवटीत ‘श्रीपूर’ नावाने ओळखले जाणारे हे शहर कोसला राज्याची राजधानी होते. येथील प्राचीन वास्तुकला, चुनखडीयुक्त स्ट्रोमॅटोलाइट खडक आणि बहु-धार्मिक पार्श्वभूमी या परिसराचे वेगळेपण (UNESCO) अधोरेखित करते.





