Rohit Sharma Record : हिटमॅनचा दिल्लीच्या दरबारात डंका! धोनीला मागे टाकत ख्रिस गेलच्या खास क्लबमध्ये मारली एन्ट्री
Rohit Sharma Record : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रोहितने एकाच वेळी दोन मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत.

Rohit Sharma Record 50 Sixes against CS IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या ८ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील लढतीत जरी नियमित कर्णधार हार्दिक पंड्या न खेळल्याने चर्चा रंगली असली, तरी मैदानात उतरताच ‘हिटमॅन’ रोहित शर्माने आपल्या बॅटने इतिहासाला गवसणी घातली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रोहितने एकाच वेळी दोन मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत.
हिटमॅनची धोनी-गेलच्या क्लबमध्ये एन्ट्री –
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रोहितने २६ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने मारलेला एकुलता एक षटकार त्याला एका खास विक्रमाच्या शिखरावर घेऊन गेला आहे. यासह तो ख्रिस गेल आणि एमएस धोनीच्या खास क्लबमध्ये सामील झाला आहे.
दिल्लीविरुद्ध षटकारांचे ‘अर्धशतक’ –
ROHIT SHARMA TALKING ABOUT REVIEW & FUN WITH KL RAHUL & KULDEEP YADAV. ♥️👌pic.twitter.com/PPiwBKKdyA
— Tanuj (@ImTanujSingh) April 4, 2026
आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ५० षटकार ठोकणारा रोहित शर्मा हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. या कामगिरीसह तो ख्रिस गेलच्या विशेष क्लबमध्ये सामील झाला आहे. एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने महेंद्रसिंग धोनीलाही (आरसीबीविरुद्ध ५० षटकार) मागे टाकले आहे.
एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू:
- ख्रिस गेल (विरुद्ध पंजाब) – ६१
- ख्रिस गेल (विरुद्ध केकेआर) – ५४
- रोहित शर्मा (विरुद्ध दिल्ली) – ५१
- एमएस धोनी (विरुद्ध आरसीबी) – ५०
३० पेक्षा जास्त धावांचा ‘शतकी’ धमाका –
रोहित शर्माने आजच्या ३५ धावांच्या खेळीसह आयपीएलमध्ये आपले १०० वे ३० पेक्षा जास्त धावसंख्येचे रेकॉर्ड पूर्ण केले आहे. आयपीएल कारकिर्दीत १०० वेळा ३० पेक्षा जास्त धावा करणारा रोहित हा विराट कोहलीनंतरचा (१२७ वेळा) दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. जरी रोहितला या सामन्यात अक्षर पटेलने बाद केले असले, तरी त्याची सुरुवात मुंबईसाठी विजयाचा पाया रचणारी ठरली. यापूर्वी त्याने केकेआरविरुद्ध पहिल्या सामन्यात ७८ धावांची तुफानी खेळी केली होती.





