CSK Unwanted Record : सीएसकेने नोंदवला लाजिरवाणा विक्रम! टी-२० क्रिकेटमध्ये ‘हा’ नकोसा रेकॉर्ड करणारा पहिलाच संघ
CSK Unwanted Record : चेन्नई सुपर किंग्स (CSK) च्या पदरी केवळ निराशाच आली नाही, तर त्यांच्या नावावर एका 'अनकोशित' (Unwanted) रेकॉर्डचीही नोंद झाली आहे.

CSK Unwanted Record in IPL : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी पंजाब किंग्स हा संघ सध्या सर्वात मोठा ‘अडथळा’ ठरत आहे. शुक्रवारी झालेल्या अटीतटीच्या लढतीत चेन्नईने २०९ धावांचे विशाल लक्ष्य उभे केले होते. मात्र, पंजाबने १८.४ षटकांतच हे आव्हान पार केले. या पराभवामुळे चेन्नईच्या नावावर टी-२० क्रिकेटमधील एक अतिशय खराब विक्रम नोंदवला गेला आहे.
२०० पेक्षा जास्ता धावा करूनही हारण्याचा विक्रम –
चेन्नईने आतापर्यंत पंजाब किंग्सविरुद्ध सहा वेळा २०० हून अधिक धावा केल्या आहेत, परंतु त्यापैकी पाच वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात २०० हून अधिक धावांची धावसंख्या उभारून सर्वाधिक वेळा सामना गमावणारा चेन्नई हा जगातील पहिला संघ ठरला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा संघ आहे, ज्यांना ४ वेळा अशा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
पंजाबचा ‘चेस’ मास्टर अवतार –
पंजाब किंग्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये तब्बल ९ वेळा २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे. हा एक जागतिक विक्रम असून या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा संघ (७ वेळा) दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबने गेल्या वर्षी (२०२५) कोलकाताविरुद्ध २६२ धावांचे लक्ष्य गाठून विश्वविक्रम केला होता, त्यानंतर आता चेन्नईविरुद्धचा २१० धावांचा यशस्वी पाठलाग हा त्यांचा दुसरा मोठा पराक्रम ठरला आहे.
आयुष म्हात्रेची वादळी खेळी ठरली व्यर्थ –
सामन्याबद्दल बोलायचे तर, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने आयुष म्हात्रेच्या ७३ (४३ चेंडू), शिवम दुबेच्या ४५ आणि सर्फराझ खानच्या ३२ धावांच्या जोरावर ५ बाद २०९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबकडून प्रियांश आर्याने ११ चेंडूत ३९ धावांची स्फोटक सुरुवात करून दिली, तर कर्णधार श्रेयस अय्यरने ५० धावांची संयमी खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केला.





