Rohit Sharma : ‘हिटमॅन’चा वर्ल्डरेकॉर्ड! रोहित गेलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Rohit Sharma Most Sixes Record : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक अभूतपूर्व इतिहास रचला आहे. वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळताना रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले ६५० षटकार पूर्ण केले आहेत. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, वनडे आणि टी-२०) मिळून हा टप्पा गाठणारा तो जगातील एकमेव आणि पहिला फलंदाज ठरला आहे.
सातव्या षटकात रचला इतिहास –
न्यूझीलंडने दिलेल्या ३०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केली. डावातील सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार मारताच त्याने हा ऐतिहासिक टप्पा गाठला. रोहितच्या नावावर आता कसोटीत ८८, टी-२० मध्ये २०५ आणि वनडेमध्ये ३५७ असे एकूण ६५० षटकार झाले आहेत.
Star Sports Special Poster for Rohit Sharma.🐐👑#RohitSharma𓃵 #INDvsNZ #nzvsind pic.twitter.com/wBhCxAVlV9
— Cricket Sangrah (@CricketSangrah) January 11, 2026
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोहित शर्माचे षटका:
| फॉरमॅट | सामने | एकूण धावा | षटकार |
| कसोटी | ६७ | ४,३०१ | ८८ |
| वनडे | २८०* | ११,५४२ | ३५७* |
| टी-२० आय | १५९ | ४,२३१ | २०५ |
| एकूण | ५०६* | २०,०७४* | ६५०* |
रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा सलामीवीर ठरला –
याशिवाय, रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा सलामीवीर फलंदाज बनला आहे. त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. रोहितने आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ३२९ षटकार मारले आहेत, तर गेलने सलामीवीर म्हणून ३२८ षटकार मारले होते.
ख्रिस गेल आणि आफ्रिदीला टाकले मागे –
सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (५५३ षटकार) दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (४७६ षटकार) तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने या दोघांनाही बऱ्याच अंतराने मागे टाकले आहे.
हेही वाचा – BCCI वर प्रश्नांची सरबत्ती! IND vs NZ सामन्यात बांगलादेशी अंपायरची एन्ट्री; कुणाचा आहे हा निर्णय? जाणून घ्या
सर्वाधिक षटकार मारणारे जागतिक फलंदाज:
- रोहित शर्मा (भारत): ६५०*
- ख्रिस गेल (वेस्ट इंडिज): ५५३
- शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान): ४७६
- ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड): ३९८
- जोस बटलर (इंग्लंड): ३८७
या व्यतिरिक्त रोहित शर्मा या सामन्यात वेगळी काही छाप पाडू शकला नाही. त्याने २९ चेंडूंत दोन षटकार आणि तीन चौकांच्या मदतीने २६ धावांची खेळी साकारली.





