Rohit Sharma Record : रोहित शर्माने रचला इतिहास! वनडेत अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
Rohit Sharma Record : या ऐतिहासिक कामगिरीसह त्याने दिग्गज मोहिंदर अमरनाथ यांचा ३७ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला.

Rohit Sharma Oldest Player Record For India International Cricket : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माने मैदानावर पाऊल ठेवताच क्रिकेट इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. धरमशालाच्या मैदानावर रोहित जसा फील्डिंगसाठी उतरला, तसा तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह त्याने दिग्गज मोहिंदर अमरनाथ यांचा ३७ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. गेल्या काही दिवसांपासून रोहितच्या फिटनेसबाबत क्रीडा वर्तुळात मोठी चिंता होती, परंतु सर्व फिटनेस चाचण्या यशस्वीपणे पार करून त्याने संघात पुनरागमन केले आहे.
३९ वर्षे ४४ दिवस वय; सचिन-धोनीलाही टाकले मागे –
अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरले तेव्हा रोहित शर्माचे वय ३९ वर्षे ४४ दिवस इतके होते. यापूर्वी हा भारतीय विक्रम मोहिंदर अमरनाथ यांच्या नावावर होता, ज्यांनी ३९ वर्षे ३६ दिवस वयात आपला शेवटचा सामना खेळला होता. भारतासाठी सर्वाधिक वयात आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता रोहित अव्वल स्थानी पोहोचला असून, सचिन तेंडुलकर (३८ वर्षे ३२९ दिवस) तिसऱ्या, राहुल द्रविड चौथ्या, सुनील गावस्कर पाचव्या आणि एमएस धोनी (३८ वर्षे २ दिवस) सहाव्या स्थानावर फेकला गेला आहे. रोहित तब्बल ५ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळत असून, ऑक्टोबर २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने त्याची कामगिरी महत्त्वाची मानली जात आहे.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे सर्वात वयस्कर खेळाडू:
- रोहित शर्मा – ३९ वर्षे ४४ दिवस
- मोहिंदर अमरनाथ – ३९ वर्षे ३६ दिवस
- सचिन तेंडुलकर – ३८ वर्षे ३२९ दिवस
- राहुल द्रविड – ३८ वर्षे २४८ दिवस
- सुनील गावस्कर – ३८ वर्षे ११८ दिवस
- एम.एस. धोनी – ३८ वर्षे २ दिवस
रोहित शर्माने केला आणखी एक खास पराक्रम –
Scaling Mt. 16,000 🗻
A monumental milestone unlocked by Rohit Sharma as an opener in international cricket 👏🫡
Updates ▶️ https://t.co/lCuohEZYAl #TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank | @ImRo45 pic.twitter.com/vyC4C0oPvg
— BCCI (@BCCI) June 13, 2026
रोहित शर्माने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करण्यास सुरुवात केली. आज, त्याने ११ धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून १६,००० धावा पूर्ण केल्या असून, हा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. सलामीवीर म्हणून रोहित शर्माच्या नावावर आता १६,०१० धावा आहेत. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून १६,११९ धावा केल्या होत्या. यानंतर मात्र, रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. त्याने केवळ १६ चेंडूत १६ धावांचेच योगदान दिले.





