Rahmanullah Gurbaz Century : रहमानुल्लाह गुरबाजने भारताविरुद्ध वादळी शतक ठोकत रचला इतिहास! ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
Rahmanullah Gurbaz Century : रहमानुल्ला गुरबाज ५१ चेंडूंमध्ये १०२ धावांचे योगदान दिल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला.

Rahmanullah Gurbaz Fastest Century For Afghanistan Dharamshala : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथील स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजने वादळी शतक झळकावत इतिहास रचला आहे. तो वनडे क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानसाठी सर्वात वेगवान शतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे. गुरबाजने भारतीय गोलंदाजीची दाणादाण उडवत केवळ ४८ चेंडूत शतक झळकावलं.
४८ चेंडूंत शतक, तरीही आफ्रिदीचा ‘तो’ महारेकॉर्ड सुरक्षित!
पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना ५० षटकांवरून २५-२५ षटकांचा करण्यात आला होता. वेळ कमी असल्याने गुरबाजने मैदानात पाऊल ठेवताच थेट ‘टी-२० मोड’ ऑन केला आणि एकदिवसीय सामन्यात टी-२० च्या अंदाजात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या ४८ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. गुरबाजच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे ९ वे शतक आहे.
RAHMANULLAH GURBAZ HAS 9 HUNDREDS AND 7 FIFTIES IN 53 ODI INNINGS. 🤯 pic.twitter.com/YFT7MrDpMR
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 13, 2026
तसेच भारताच्या विरोधात वनडेत ठोकलेले हे दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. या वादळी खेळीनंतरही तो पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा २१ वर्षे जुना महारेकॉर्ड मोडू शकला नाही. आफ्रिदीने भारताविरुद्ध अवघ्या ४५ चेंडूंत शतक झळकावले होते, जे आजही अव्वल स्थानावर आहे. या यादीत ५१ चेंडूंत शतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे.
एका बाजूने पडझड, दुसऱ्या बाजूने गुरबाजचा धमाका!
Rahmanullah Gurbaz struck a blistering hundred in a rain-curtailed ODI against India, also becoming Afghanistan’s fastest centurion in the format in the process 🇦🇫#INDvAFG pic.twitter.com/msrxbc4dT7
— Wisden (@WisdenCricket) June 13, 2026
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. भारतीय गोलंदाजांच्या घातक माऱ्यासमोर एका टप्प्यावर अफगाणिस्तानने अवघ्या २६ धावांवर ३ मुख्य गडी गमावले होते. टॉप ऑर्डर पत्त्यांच्या घरासारखी विखुरली असतानाही गुरबाजने धीर सोडला नाही. त्याने एक बाजू भक्कमपणे लावून धरत अधिक आक्रमक पवित्रा घेतला. त्याने आपल्या शतकी खेळीत ४ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार खेचले.
रहमानुल्ला गुरबाज ५१ चेंडूंमध्ये १०२ धावांचे योगदान दिल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. १६व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नितीश कुमार रेड्डीने एका अचूक यॉर्करवर गुरबाजला क्लीन बोल्ड केले. त्याच्या या एकाकी झुंजार खेळीमुळे अफगाणिस्तान संघ भारतासमोर एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला आहे.





