Rohit Sharma : हिटमॅनच्या नव्या अवताराने वेधलं लक्ष! ३८ व्या वर्षी तब्बल ‘इतके’ वजन कमी करत सर्वांना केलं चकित

Rohit Sharma weights loss : भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसवर नेहमीच चर्चा होत आली आहे. मात्र, प्रत्येक वेळी ‘हिटमॅन’ने आपल्या विस्फोटक फलंदाजीने टीकाकारांचे तोंड बंद केले. आता एक मोठी बातमी समोर येत आहे की, कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहितने तब्बल 10 किलो वजन कमी केले आहे. हा खुलासा रोहितचा जवळचा मित्र आणि भारतीय संघाचा माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर याने केला.
अभिषेक नायर नायरने शेअर केली इन्स्टा स्टोरी –
अभिषेक नायर नायरने इन्स्टाग्राम स्टोरीवर रोहितसोबतचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “10,000 ग्रॅम कमी करूनही आम्ही सातत्याने पुढे जात आहोत.” आयपीएल 2025 नंतर रोहितने कोणत्याही क्रिकेट प्रकारात सहभाग घेतलेला नाही. या दीर्घ विश्रांतीच्या काळात तो क्रिकेटपासून दूर आहे, पण या गोष्टीला त्याने आपली कमजोरी बनू दिले नाही. उलट, रोहितने फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित करत स्वतःला नवे आव्हान दिले. कारण वयाची 38 वर्षे ओलांडल्यानंतर 10 किलो वजन कमी करणे कोणत्याही खेळाडूसाठी मोठी गोष्ट आहे.
Fitness grind in full swing as Rohit Sharma and Abhishek Nayar train together! 💪#ODIs #RohitSharma #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/A04B4BnuaM
— Sportskeeda (@Sportskeeda) September 24, 2025
रोहित-विराट जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार –
रोहितचा हा बदललेला अवतार येत्या ऑस्ट्रेलिया मालिकेला गांभीर्याने घेत असल्याचे संकेत देतो. तीन वनडे सामन्यांच्या या मालिकेत रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरेल. विशेष म्हणजे, यावेळी त्याच्यासोबत विराट कोहलीचीही पुनरागमन होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटला वर्षानुवर्षे उज्ज्वल करणारी रोहित-विराट जोडी पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळेल.
रोहितचे वनडे कारकीर्द अजूनही दमदार सुरू आहे. आयसीसी वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत तो दुसऱ्या स्थानावर आहे, तर त्याच्यापुढे फक्त शुबमन गिल आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात रोहितने 76 धावांची शानदार खेळी साकारत आपली ताकद पुन्हा सिद्ध केली होती. आता रोहितच्या वजन कमी करण्याच्या बातमीने चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
हेही वाचा – IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! जडेजाला मिळाली मोठी जबाबदारी
रोहितच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण –
ही बातमी केवळ उत्साहवर्धकच नाही, तर रोहित शर्मा अजूनही मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा इरादा बाळगून आहे, हा संदेशही देते. प्रश्न असा आहे की, तो 2027 विश्वचषकापर्यंत भारतीय संघाची सलामी करेल का? सध्यातरी एक गोष्ट निश्चित आहे की, फिटनेसच्या नव्या जोशासह रोहित शर्मा पुनरागमनासाठी पूर्णपणे सज्ज आहे.





