Rohit Pawar: ‘मोशी दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला धमकावले’; आमदार रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ
Rohit Pawar: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला ४० लाखांवर तडजोड करण्यासाठी धमकावल्याचा रोहित पवार यांचा आरोप; ५ दिवसांत पुढील दिशा ठरवणार.
Rohit Pawar – मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेत लहान कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून निष्काळजीपणा, दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार लोकांना वाचविले जात आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांना केवळ निलंबित न करता त्यांच्यावर, तसेच कंपनीच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी (दि.१४) केली.
तसेच पीडित कुटुंबाने एक कोटी रुपयांची मागणी केली असता त्यांना धमाकावले असा आरोप देखील पवार यांनी केला. आमदार पवार यांनी आय़ुक्त विजय सुर्यवंशी यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, या दुर्दैवी घटनेतील पीडित कुटुंबाला १ कोटी रुपयांची भरपाई मिळावी, ही मागणी होती.
सुरुवातीला संबंधित कंपनीने २५ लाख आणि दबावानंतर ती रक्कम ४० लाखांपर्यंत वाढवण्यात आली. नातेवाइकांना धमकावून ४० लाख रुपयांवर तडजोड करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती आमच्याकडे आली. त्याची आम्ही शहानिशा करत असून पुढील ५ दिवसांत कुटुंबासोबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू, असेही त्यांनी म्हटले.
या प्रकरणात ज्या कंपनीकडे कंत्राट होते. त्या कंपनीने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीर दुर्लक्ष केले आहे. मात्र, कंपनीने आणि संजय कुलकर्णी नावाच्या व्यक्तीने या विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे दिसते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणीही पवार यांनी केली.
कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करा
कंपनीने करोडो रुपये कमावले, त्यांच्या मालकाला सोडून देऊन प्रशासनाने सिक्युरिटी मॅनेजर असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. त्यांच्या कुटुंबीय आज आले होते. त्यांचे म्हणणे आयुक्तांपुढे मांडले आहे. बड्या मालकांना वारेवर सोडून सामान्य व्यक्तीवर कारवाई केली जात आहे.
या लढ्यात आपण पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. चौकशीची प्रक्रिया ६ महिने न लावता पुढील १ ते दीड महिन्यांत पूर्ण व्हावी. वेस्ट टू एनर्जीचे काम करणाऱ्या कंपनीच्या मालकावर कडक कारवाई करण्यात यावी. या सगळ्यावर प्रशासनाकडून आम्हाला येत्या मंगळवारी उत्तर मिळणे अपेक्षित असल्याचेही रोहित पवार म्हणाले.






