Rohit Pawar: रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस; प्रकृती खालवली तरीही भूमिकेवर ठाम
Rohit Pawar: सरकारच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले आहेत. पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीच्या मागणीचा आग्रह धरत रोहित पवार यांनी शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून रोहित पवार यांची प्रकृती काहीशी खालावली असून त्यांची साखरेची पातळी कमी झाली आहे.
मात्र अद्यापही रोहित पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कर्जमाफीच्या जाचक अटी जोपर्यंत सरकार हटवत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा रोहित पवार यांनी घेतला आहे.
आंदोलनामुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांबद्दल सांगताना रोहित पवार म्हणाले, “आज तिसऱ्या दिवशी शारीरिक त्रास वाढला आहे. साखरेची पातळी कमी झाली असून रक्तदाब सध्या नॉर्मल आहे. तरी देखील भेटायला येणाऱ्या सर्वसामान्य लोकांची भेट झाल्यानंतर आतून ऊर्जा मिळते आणि त्यातूनच हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.”
शासनाला आजच्या दिवसाचा अल्टिमेटम
पुढे रोहित पवार म्हणाले, “आज जर शासनाकडून अटी मान्य न झाल्यास उद्या सकाळी विठू माऊलीच्या दारात नामदेव पायरी येथे आंदोलन सुरू करण्याचा मानस आहे,” असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. त्यामुळे आता सरकारच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आज तिसऱ्या दिवशी खासदार संजय राऊत, मनोज जरांगे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्यासह अनेक प्रमुख नेते आंदोलनस्थळी पोहोचत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
कार्यकर्त्यांकडून रस्ता रोको
दुसरीकडे, रोहित पवार यांच्या आंदोलनला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सरकारने रोहित पवार यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आक्रमक कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून नांदुरा – बुऱ्हानपूर मार्गावरील खांडवी फाटा येथे रास्ता रोको केला आणि सरकार विरोधी घोषणांबाजी केली. त्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली होती पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक पूर्ववत केली.
रोहित दादा, आम्ही येतोय तुम्हाला बळ देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी!
पंढरपूरच्या भूमीत शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी सुरू असलेल्या @RRPSpeaks यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे !
राज्यभरातून शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने येऊन… pic.twitter.com/f7bIZgUIP4
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 14, 2026
‘कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकरी कुटुंबांच्या अस्तित्वाची, जीवनमरणाची लढाई’
रोहिणी खडसे यांनीही ट्वीट करत म्हंटले की, “रोहित दादा, आम्ही येतोय तुम्हाला बळ देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी! पंढरपूरच्या भूमीत शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी सुरू असलेल्या रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. राज्यभरातून शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने येऊन या लढ्याला पाठिंबा देत आहेत. ही साधी लढाई नसून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकरी कुटुंबांच्या अस्तित्वाची, जीवनमरणाची लढाई आहे.”
सरकारने आता वेळकाढूपणा न करता शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे.
हेही वाचा:






