रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण, महिला अधिकारी प्रकरणावरून मित्रपक्षांवरच केला आरोप; चर्चाना विधान

Ajit Pawar : सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत कारवाई थांबवा, मी तुम्हाला आदेश देतो असे म्हणत अजित पवार यांनी दादागिरीची भाषा महिला पोलीस अधिकाऱ्याला केल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली ३५-४० वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे , असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांची पाठराखण केल्याचे दिसत आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार म्हणाले, राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि मा. अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसते. वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली ३५-४० वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.
करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही. पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे, त्यामुळं आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो, हेही अजितदादांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवं. आम्ही मात्र नको त्या वादात तेल न घालता खऱ्या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधत राहू, असं आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि मा. अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसते. वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 5, 2025
नेमकं काय घडलं होतं?
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून तहसीलदार आणि तलाठी या गावात गेले होते. पण येथील काही लोकांनी अधिकाऱ्यांना दमदाटी केली. याची माहिती मिळताच करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा त्यांच्या पथकासह घटनस्थळी गेल्या. तिथे गेल्यानंतर अजित पवारांनी त्यांना कारवाई करू नका असा आदेश दिला. या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
त्या ग्रामस्थांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी आता कुर्ड गावातील १५ ते २० ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी घडल्याची माहिती आहे. बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांच्यासह 15 ते 20 ग्रामस्थांचा समावेश आहे. याप्रकरणी, ग्राममहसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी तक्रार दिली होती. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




