Rohit Pawar : रोहित पवार दादांच्या मदतीला धावले; अंजना कृष्णा प्रकरणावर पोस्ट, म्हणाले “मित्रपक्षाकडून जाणीवपूर्वक…”

Rohit Pawar : सोलापूरच्या माढा तालुक्यातील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणाने राज्यातील राजकारण चांगलंचं तापलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड विरोधकांकडून उठवली जात आहे. दरम्यान, या वादग्रस्त प्रकरणी अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी अजित पवारांसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून रोहित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
कुर्डु प्रकरणात अजित पवारांचा केवळ हिंदी भाषेमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे घोळ झाला, असं पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले आहेत. अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त करून देखील जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल मित्रपक्षाकडून सुरू असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. पक्षातील दोन आणि तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांकडून सध्या राष्ट्रवादीच्या मित्रपक्षाला साजेशी भूमिका घेतली जात असून स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या केल्या जात असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला आहे.
रोहित पवारांची एक्स पोस्ट
कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्याठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही जाणूनबुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की !
मित्रपक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील!
राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या दोन तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे? असो पक्षात “चहापेक्षा किटली गरम असणारे” एक दोन सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्वकाही आलबेल असतेच असे नाही, याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला यानिमित्ताने आलाच असेल.
नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांना तुमच्यावर अॅक्शन घेईल, असा दम देतानाची एक क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. अंजना कृष्णा यांना माढ्याच्या कुर्ड गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यामुळे त्या घटनास्थळी पोहचल्या, मात्र गावातील काही लोकांनी त्यांच्यासोबत हुज्जत घातली. यातल्याच एका व्यक्तीने थेट अजित पवारांनी फोन लावला आणि अंजना कृष्णा यांच्या हातात फोन बोलण्यासाठी दिला. यानंतर दोघांमध्ये संवाद झाला. या संवादाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
हेही वाचा : अमेरिकेचे आणखी एक पाऊल ! भारतासाठी मोठी समस्या ; ‘हा’ उद्योग येणार धोक्यात?





