Rohit Pawar : करामती नेत्यांना सोडणार नाही; रोहित पवार यांची टीका
सोलापूर जिल्हा नियोजनचा निधी साताऱ्याच्या ठेकेदारांना वाटणाऱ्या करामती नेत्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांच्या करामती बघितल्यानंतर तुम्हीच त्यांना करामती पालकमंत्री म्हणाल, असा घणाघात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला.

Rohit Pawar : सोलापूर जिल्हा नियोजनचा निधी साताऱ्याच्या ठेकेदारांना वाटणाऱ्या करामती नेत्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांच्या करामती बघितल्यानंतर तुम्हीच त्यांना करामती पालकमंत्री म्हणाल, असा घणाघात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला.
सोलापूर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत आमदार पवार हे बोलत होते. रोहित पवार म्हणाले, पुणे पदवीधरची जागा अजित पवार गटाला मिळायला हवी होती. मात्र भाजपने त्यांची ताकद कमी केली. अजितदादांचा पक्ष आज सक्षम राहिला नाही. अर्थ खात्याचा कारभार थेट मुख्यमंत्र्यांकडे गेला असून तो परत मागण्याची धमकही त्या पक्षात राहिली नाही.
शेतकरी प्रश्नावर ते (Rohit Pawar) म्हणाले, राज्यात सरासरी ३१ टक्के पाऊस झाला आहे. कर्जत-जामखेडमध्ये ३० टक्के, तर नाशिक विभागात ३४ टक्के पाऊस झाला आहे. पुण्यातील धरणसाठा ९३ टक्क्यांवरून ८१ टक्क्यांवर आला आहे. अशा परिस्थितीत सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. सोयाबीनसाठी हेक्टरी २८ हजार खर्च येतो. सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख आणि फळबागांसाठी दीड लाख रुपयांची मदत द्यावी.
बारामतीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून तलाठी शेतकऱ्यांची लूट करत आहेत. शक्तीपीठ महामार्गासाठी ४० हजार कोटींचा चुराडा करण्यापेक्षा तो निधी शेतकऱ्यांसाठी वापरावा. आयटी पार्कमध्ये तरुणांना रोजगार नाही. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आयटी पार्क ची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी एमपीएससी आंदोलनात विद्यार्थ्यांसाठी रात्रभर थांबून काम केले असून त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी (Rohit Pawar) केले.






